प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मातीतून सोने उगवले, लाखो रुपये वर्षाला कमवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 01:16 PM2022-04-25T13:16:34+5:302022-04-25T13:16:46+5:30
‘दिलपसंद’ मिळवून देणार चार महिन्यात 60 लाख
बाळासाहेब काकडे/विजयकुमार गाडेकर
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : तालुक्यातील २५ शेतकऱ्यांनी ढेमसे (दिलपसंद) या वेलवर्णीय पिकाची सामूहिक लागवड केली. सध्या त्याची विक्री सुरू असून शंभर रुपये किलो दर मिळत आहे. या हिशेबाने पुढील चार महिन्यात ५० ते ६० लाखांच्या उलाढालीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
२० शेतकऱ्यांनी लागवड केली. १५ ते २० मेट्रिक टन एकरी उत्पादन निघणार आहे. पिकाला २५ ते १०० रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. एकरी दीड ते दोन लाखांची कमाई होणार आहे. हे ढेमसे पुणे, मुंबईत भाव खात आहेत.
ढेमशाचे पीक घेण्यास घरच्यांचा विरोध होता; मात्र राहुल पोळ यांनी प्रोत्साहन दिले. आम्ही २० शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने ही शेती केली. त्यामुळे मार्केटिंगचे काम सोपे झाले. चार महिन्यात दीड ते दोन लाखांचे उत्पादन अपेक्षित आहे.- ओंकार पोटे, शेतकरी.
श्रीगोंद्यातील शेतकरी फळबागा आणि ऊस शेतीस प्राधान्य देतात; मात्र काळाच्या ओघात कमी कालावधीतील पिके घेण्यासाठी पुढे येत आहेत. यातूनच ढेमशाची सामूहिक लागवड करण्यात आली. - राहुल पोळ, कृषी मार्गदर्शक, श्रीगोंदा
खडकाळ जमिनीवरही दरवळला ‘केशरा’चा सुगंध
शिरूर कासार (जि. बीड) : ‘ओले मूळ भेदी खडकाचे अंग’ या अभंगाची प्रचीती शिरूर सुतारनेट येथे राहणारे प्रगतिशील शेतकरी दाम्पत्य केशरबाई आणि पांडुरंग कातखडे यांनी दाखवली आहे. कातखडे यांनी अर्धा एकर शेतीवर केशर आंब्याची बाग फुलविली आहे. विशेष म्हणजे ही जमीन पूर्णपणे खडकाळ असून, विहिरीचे पाणी ठिबक पद्धतीने देऊन बागेला बहर आणला आहे. २०१७ मध्ये राहुरी येथील कृषी विद्यापीठातून तुकाराम कातखडे यांनी केशर आंब्याची ५० झाडे आणली होती. दोन बाय दोन खड्डा घेऊन पंधरा फुटांवर या झाडांची लागवड केली. रोगराईचा धोका लक्षात घेऊन दोन वेळा फवारणीदेखील केली.
पाच वर्षांनी झाडांना फळे लगडली असून, एका झाडाला सरासरी शंभर ते दीडशे कैरी दिसून येत आहे. गतवर्षी १५ ते २० हजार रुपयांची उलाढाल झाली. यावर्षी उत्पन्न वाढीची शक्यता आहे.
केशर आंब्याला मोठ्या प्रमाणावर गोडी असल्याने ग्राहकांची पसंती कायमच असते. गतवर्षी रोगराई आणि अवकाळी पावसामुळे उत्पन्नावर थेट परिणाम झाला. यावर्षी बहर चांगला असून, रोगराईची शक्यता वाटत नाही. यंदा चांगला भाव मिळू शकतो. - पांडुरंग कातखडे, शेतकरी, शिरूर.