सेल्समनच्या मुलानं अंदमानमध्ये G-20 देशांचा केला पाहुणचार; मेहनत अन् कौशल्यानं गाठलं यशाचं शिखर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 08:57 AM2022-12-04T08:57:54+5:302022-12-04T09:01:23+5:30
उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील रहिवासी असलेल्या प्रतिक जयस्वाल यानं अगदी कमी वयात मोठं यश प्राप्त केलं आहे.
गाजीपूर-
उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील रहिवासी असलेल्या प्रतिक जयस्वाल यानं अगदी कमी वयात मोठं यश प्राप्त केलं आहे. अंदमान-निकोबारमध्ये जी-२० देशांच्या बैठकीचं व्यवस्थापन करणाऱ्या टीमचा सदस्य होण्याची संधी प्रतिकला मिळाली. प्रतिक मध्यमवर्गीय कुटुंबाचं प्रतिनिधीत्व करतो. त्याचे वडील गेल्या २८ वर्षांपासून सेल्समनची नोकरी करत आहेत. घरची परिस्थिती बेताची असतानाही प्रतिकनं हॉटेल मॅनेजमेंटसारख्या खर्चिक शिक्षणाचा मार्ग पत्करला. एकेकाळी गरिबीमुळे उपाशी झोपावं लागलेल्या प्रतिकच्या आजच्या यशावर त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड अभिमान आहे.
प्रतिकनं नुतकंच नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याची आजवरची कहाणी सांगितली. "जेव्हापासून मी कळत्या वयाचा झालो तेव्हापासून मी माझ्या वडिलांना कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करताना पाहत आलो आहे. त्यामुळे लहान वयातच मला घरची आर्थिक परिस्थिती कळली होती. त्यामुळे बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गाझीपूरच्या एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. काम करत असताना हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास केला तर उत्तम प्लेसमेंट आणि मोठ्या पॅकेजची नोकरी मिळू शकते हे माझ्या लक्षात आलं", असं प्रतिक सांगतो.
एकदा प्रतिकनं केंद्र सरकारच्या पर्यटन विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या दिल्लीस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग अँड न्यूट्रिशनमध्ये अर्ज केला. प्रतिकलाही गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळाला. आता प्रवेशाच्या वेळी भराव्या लागणाऱ्या फीची व्यवस्था करण्याचं आव्हान प्रतिक आणि त्याच्या कुटुंबियांसमोर होतं. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबीयांनी नातेवाइकांकडून उसने पैसे घेतले आणि प्रतिकला दिले, जेणेकरून तो त्याची फी भरू शकेल.
मुलाच्या अॅडमिशनसाठीही जाऊ शकले नाहीत वडील
आपल्या मुलाच्या अॅडमिशनसाठी दिल्लीला जाण्याची खूप इच्छा होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे जे शक्य होऊ शकलं नाही. दोन जणांचा खर्च करण्यात काही अर्थ नव्हता असं त्यावेळी आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे मुलानं एकट्यानंच जाऊन प्रवेश घेतला होता, असं प्रतिकचे वडील ओमप्रकाश जयस्वाल सांगतात. तसंच माझ्या मुलानं जो संघर्ष केलाय तो इतर कुणाला करावा लागू नये, असंही ते पुढे म्हणतात.
ओमप्रकाश जयस्वाल लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. तर ते ८ वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरून आईची मायाही हरपली. अशा परिस्थितीत ओमप्रकाश जयस्वाल यांच्या तीन बहिणी आणि दोन भावांचा सांभाळ त्यांच्या मामानं केला. घरची जबाबदारी असल्यानं ओमप्रकाश यांनी लवकरात लवकर नोकरी केली पाहिजे. जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील असं ठरवलं. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य येण्यासाठी गेल्या २८ वर्षांपासून एका कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत असल्याचं ओमप्रकाश सांगतात.
प्रतिकला अशी मिळाली संधी
प्रतिक १ वर्षाचा डिप्लोमा कोर्स करत होता. यादरम्यान त्याला एका मोठ्या संस्थेची कार्यशैली समजून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. प्रतिकनं दिल्लीतील ताज मानसिंग हॉटेल गाठलं. तिथं त्याने संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन काम शिकण्याची संधी देण्याची विनंती केली. प्रतिकला ताजमान सिंग येथे काम शिकण्याची संधी मिळाली. डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतरच त्याला इंटर्नशिपसाठी पात्र समजलं जायला हवं होतं. पण शिकण्याची इच्छा पाहून प्रतिकला ताज मानसिंग यांच्या व्यवस्थापनातील लोकांनी त्याला संधी दिली.
अंदमानमधील कार्यक्रम हाताळण्यासाठी दिल्लीतील ताज मानसिंग हॉटेलमधून ५ जणांची टीम पाठवली जाणार होती. प्रतिकही ५ जणांच्या टीममध्ये सामील झाला. सुरक्षेच्या कारणास्तव G-20 देशांच्या बैठकीत मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी न मिळाल्याची खंत असल्याचं प्रतिक सांगतो. नाहीतर या मोठ्या प्रसंगाच्या आठवणी छायाचित्रांच्या माध्यमातून टिपता आल्या असत्या.