दिव्यांग विद्यार्थ्यानं बनवला 'असा' अविष्कार; मंत्र्यांपासून सरकारच मदतीला धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 07:52 AM2023-07-25T07:52:29+5:302023-07-25T07:53:21+5:30
इंद्रेश दिव्यांग असला तरी त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. इंद्रेशच्या या अविष्कारामुळे उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनीही त्याचा सन्मान केला आहे.
सोनभद्र – भारतात दरवर्षी रस्ते अपघातात हजारो लोकांचा जीव जातो. रस्ते अपघात रोखण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्नशील असते. परंतु रस्ते अपघाताचा वेग कमी होताना दिसत नाही. हे अपघात रोखण्यासाठी सोनभद्र येथील १२ वीच्या वर्गात शिकणारा दिव्यांग विद्यार्थी इंद्रेश कुमारने अनोखा अविष्कार बनवला आहे. एक असं हेल्मेट जे रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकते.
हे हेल्मेटला बाइकला कनेक्ट केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही हेल्मेट घालत नाही तोवर बाईक सुरूच होणार नाही. इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीच्या तोंडातून दारूचा वास येत असेल तेव्हाही बाईक सुरू होणार नाही. त्यामुळे हेल्मेट न घातल्यामुळे होणाऱ्या अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल आणि ड्रंक अँन्ड ड्राईव्हला आळा बसेल. इंद्रेश कुमार सोनभद्रच्या रॉबर्ट्सगंज तालुक्यातील मधुपूर गावात राहणारा आहे. तो ज्योती इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. दिव्यांग असल्याने त्याला पायाने चालता येत नाही.
इंद्रेश दिव्यांग असला तरी त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. इंद्रेशच्या या अविष्कारामुळे उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनीही त्याचा सन्मान केला आहे. इंद्रेश आता त्याने बनवलेल्या अनोख्या हेल्मेटचे पेटेंट घेण्याच्या तयारीत आहे. इंद्रेशने बनवलेले हेल्मेट घातल्यानंतर रस्ते दुर्घटनेत होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते. इंद्रेशचे वडील एका रस्ते अपघातात जखमी झाले होते. तेव्हा इंद्रेशला अशाप्रकारचा हेल्मेट बनवण्याची कल्पना सुचली. २ वर्षापूर्वी इंद्रेशचे वडील दारू पिऊन दुचाकी चालवत होते. त्यावेळी त्यांचा अपघात झाला आणि ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर असं हेल्मेट बनवण्याचा विचार इंद्रेशने केला ज्याने दारू प्यायल्याने दुचाकी स्टार्ट होणार नाही. त्यासोबतच हेल्मेट नसेल तरीही दुचाकी बंदच राहील.
डिसेंबर २०२२ मध्ये जिल्हा मुख्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत इंद्रेशने आपला आविष्कार दाखवला. यानंतर लोकांचे लक्ष या शोधाकडे गेले आणि त्याचे खूप कौतुक झाले. इंद्रेश कुमार गरीब कुटुंबातील असून त्यांच्याकडे फक्त २ एकर जमीन आहे. त्याचे वडील रामावतार हे शेतकरी आहेत आणि आई कमलावती देवी गृहिणी आहेत. त्याला दोन बहिणी आणि एक लहान भाऊ असून त्या अनुक्रमे ९वी, १०वी आणि ७वी मध्ये शिकत आहेत.
परिवहनमंत्र्यांनीही केलं कौतुक, आरटीओ मिर्झापूर करतंय मदत
या अविष्कारानंतर परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनीही इंद्रेशचं संशोधन पाहिले आणि त्याचे कौतुक केले. त्याला लखनौला बोलावून ५०००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यानंतर, एआरटीओ धनवीर यादव सोनभद्र आणि आरटीओ मिर्झापूर देखील त्याला मदत करत आहेत, जेणेकरून त्याला त्याच्या शोधाचे पेटंट मिळू शकेल. सध्या मी माझ्या अविष्कारात आणखी सुधारणा करत आहे, माझ्या संशोधनाची केवळ सोनभद्र जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चा आहे असं इंद्रेश कुमारनं सांगितले.