मी यूट्यूबर- टेक्निकल लोचा? मराठी तोडगा; मराठवाड्याचा 'ओम' झाला फेमस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 05:44 AM2022-12-04T05:44:45+5:302022-12-04T05:45:25+5:30
किचकट वाटणाऱ्या टेक्निकल समस्या चुटकीसरशी सोडवायच्या कशा याचे उत्तर देणाऱ्या यू ट्युबरची कहाणी..
महेश गलांडे
मराठवाडा म्हटलं की केवळ दुष्काळ आणि हाती घागर- कळशी घेऊन जाणारी मुलंच, तर कधी सायकलीवरून पाणी घेऊन घराकडे निघालेली माणसं हेच चित्र आपण माध्यमांत किंवा बातम्यात पाहिलं आहे. मात्र, मराठवाड्यातील जालनासारख्या ग्रामीण भागातील तरुणाईही आता काळासोबत स्पर्धा करत आहे. याच जालन्यातील ओम सावळे नावाचा युवक यू ट्युबर बनून फेमस झालाय.
टेक्नॉलॉजीसंबंधी माहिती द्यायचं काम तो ‘ओमचे टेक’ या चॅनलच्या माध्यमातून करतो. माय मराठीत टेक्निकल कोडं तो उलगडत असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या त्याच्या चॅनलचे एक लाख ४० हजार फॉलोअर्स असून आतापर्यंत ६६ लाख ५२ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.
भारतात टिकटॉक बॅन झाल्याने टिकटॉकवरील फेमस मंडळींचा धुव्वा उडाला. मग, ओमनेही टिकटॉक बंद पडल्यानंतर कोरोनाच्या काळात ९ जून २०२० रोजी ओमचे टेक नावाने यू ट्युब चॅनेल सुरू केले. त्यावर, डिश टीव्हीवरून घरातल्या टीव्हीवर फ्री चॅनल्स कसे पाहायचे, यासंदर्भातील पहिला व्हिडीओ अपलोड केला. यापूर्वी टिकटॉकवर त्याने हाच व्हिडीओ बनवला असता त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ओमचे टिकटॉकवर साडेसहा लाख फॉलोअर्स होते. मात्र, टिकटॉक बंद पडल्याने त्याने यू ट्युबवरही तोच प्रयोग केला. अनेकांनी फोन करून, प्रत्यक्ष भेटून कौतुक केले. तिथून या प्रवासाला गती मिळाल्याचे ओमने सांगितले.
ओमचे वडील इलेक्ट्रिशियनची कामे करतात. त्यामुळे, टेक्नॉलॉजीसंबंधीची आवड त्यालाही होती. त्यातूनच त्याने डिजिटल टेक्नॉलॉजीवर लक्ष केंद्रित केलं. ओमने एमएसडब्लूमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून सध्या पूर्णवेळ यू ट्युबच्या कामासाठी देत आहे. विशेष म्हणजे, ओमची पत्नी कोमल याही यू ट्युबबर असून कौटुंबिक घडामोडींवर त्या ब्लॉग बनवतात. त्यांच्याही यू ट्युब चॅनलला दाेन लाख ४० हजार फॉलोअर्स आहेत. दोघे मिळून महिन्याला ७० ते ८० हजार रुपये या डिजिटल दुनियेतून कमावतात. ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीवर भर देत व्हिडीओ करत राहणार असल्याचे ओमने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.