धनश्री नावाच्या तरुण मुलीची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 10:54 AM2024-11-07T10:54:29+5:302024-11-07T10:55:04+5:30

Inspirational Stories: शाळकरी वयात चार वर्षांत तीन वेळा कॅन्सरच्या निदानाला सामोरे जावे लागलेल्या धनश्री नावाच्या तरुण मुलीची गोष्ट वाचत होते. तिचा कॅन्सर सोपा नव्हता. शिवाय ऐन करिअर निवडीच्या काळात हा पाहुणा  आजार तिच्याकडे पोहोचला.

Inspirational Stories: The story of a young girl named Dhanashree | धनश्री नावाच्या तरुण मुलीची गोष्ट

धनश्री नावाच्या तरुण मुलीची गोष्ट

- वंदना अत्रे
(दुर्धर व्याधीग्रस्तांच्या मदतगटात कार्यरत)

आपण कशासाठी जगत असतो, असा प्रश्न कोणी आपल्याला विचारला तर आपण गांगरून जातो. चटकन त्याचे उत्तर आपल्याला सुचत नाही. एखाद्या आजाराने त्रस्त होऊन हॉस्पिटलच्या पलंगावर पडायला लागल्यावर मात्र हा प्रश्न आपल्याला सतावत राहतो. अनेकदा जगण्याबद्दलचा उद्वेग त्यामध्ये असतो.
शाळकरी वयात चार वर्षांत तीन वेळा कॅन्सरच्या निदानाला सामोरे जावे लागलेल्या धनश्री नावाच्या तरुण मुलीची गोष्ट वाचत होते. तिचा कॅन्सर सोपा नव्हता. शिवाय ऐन करिअर निवडीच्या काळात हा पाहुणा  आजार तिच्याकडे पोहोचला. ऐन नववीमध्ये कॅन्सरचे निदान प्रथम झाले. दहावी संपता संपता तो परत उलटला आणि थेट बारावीपर्यंत रेंगाळला. पण, तरीही पराभूत भावना या मुलीने कधीच तिच्या जवळपाससुद्धा येऊ दिली नाही. तिने याचे श्रेय तिच्या आजोबांना दिले आहे.

तरुण वयात उत्तम घोडेस्वारी करणारे, स्पर्धांमध्ये जिंकणारे आजोबा एका स्पर्धेत असे जबर जायबंदी झाले की, त्यांना पुन्हा घोड्याचा लगाम हातात पकडणेसुद्धा शक्य होऊ नये. पण, आपल्या अपघाताची भावनिक झळ त्यांनी कधीच आपल्या कुटुंबाला लागू दिली नाही. अपघातातून वाचून घरी आल्यावर आपल्या कुटुंबाशी बोलताना ते म्हणाले, घोडेस्वारी करण्याची सक्ती कोणी माझ्यावर केली नव्हती. मी त्याचा खूप आनंद घेतला आणि तो मला आयुष्यभर साथ देत राहील.

धनश्रीही असे काहीसे म्हणाली, ‘कॅन्सरला मी कधीच माझ्या जीवनात बोलावले नव्हते. पण, एक मला ठाऊक आहे. त्याला जेवढा आणि जसा मुक्काम करायचा तेवढा करून तो जाणार आहे. मी माझ्या उद्दिष्टावरून माझे लक्ष हटवणार नाही.’- याच धैर्याने ती येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर उपाय शोधत राहिली. अगदी बारावीची परीक्षासुद्धा लेखनिक घेऊन तिने पार पाडली.

तिला डॉक्टर व्हायचे आहे. आता त्या उद्दिष्टात एक छोटा बदल आला आहे. आता तिला कॅन्सरतज्ज्ञ व्हायचे आहे ! जगण्याचे छोटे का होईना, उद्दिष्ट जेव्हा आपल्या मनात असते तेव्हा असे मध्ये मध्ये येणारे आजार हे रस्त्यावर येणाऱ्या स्पीड ब्रेकरसारखे असतात. त्याचा बागुलबुवा किती करायचा?
(lokmatbepositive@gmail.com)

Web Title: Inspirational Stories: The story of a young girl named Dhanashree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.