वडील चप्पल शिवायचे; त्यांच्या मृत्यूनंतर अंडी विकली, विरेंद्र बिहारमध्ये अधिकारी बनला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 06:41 PM2021-06-09T18:41:15+5:302021-06-09T18:41:44+5:30
Inspirational story : प्रत्येकजण आपले नशीब आपल्याच हाताने लिहितो. कोणी यशस्वी होतो, कोणी अपयशी, कोणी नशिबाला दोष देत बसतो. मात्र, काही मोजक्याच लोकांची यशोगाथा लोकांना प्रेरित करते.
प्रत्येकजण आपले नशीब आपल्याच हाताने लिहितो. कोणी यशस्वी होतो, कोणी अपयशी, कोणी नशिबाला दोष देत बसतो. मात्र, काही मोजक्याच लोकांची यशोगाथा लोकांना प्रेरित करते. बिहार लोक सेवा आयोगाची (BPSC) परीक्षा क्रॅक करणाऱ्या विरेंद्र याने 2,232वी रँक प्राप्त केली आहे. त्यांना आता ‘ब्लॉक सप्लाई ऑफिसर’ म्हणून नियुक्त केले जाणार आहे. या विरेंद्रची पायवाट काही सोपी नव्हती. (bihar civil services exam cracked by birendra who sell eggs to help family economy)
वीरेंद्रचे वडील लोकांच्या चप्पला शिवायचे. त्यांचा 2012 मध्ये मृत्यू झाला. विरेंद्रच्या मोठ्या भावाने वडिलांचा व्यवसाय सांभाळला, यामुळे विरेंद्रचा अभ्यास पुढे सुरु राहिला. मात्र, एक वेळ अशी आली की, घरातील आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. यामुळे विरेंद्रने शिक्षण सुरु ठेवण्यासाठी अंडी विकण्याचे काम सुरु केले.
27 वर्षीय विरेंद्रने प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी 2012 पासून अंडी विकण्यास सुरुवात केली. 5 वर्षे मी हे काम करत होतो. तोवर माझ्या भावाच्या व्यवसायाची घडी नीट बसली होती. आमच्याकडील राजीव सर आणि इंटरनेटचा आधार घेऊन अभ्यास सुरु केला आणि पहिल्याच प्रयत्नात मी परीक्षा पास झालो.
जानेवारीमध्ये विरेंद्रने त्याच्या आईला गमावले. आई, वडील मला अधिकारी बनताना पाहू शकत नाहीत, हे शल्य राहिले, असे तो म्हणाला. बीपीएससी दिली आहे, पुढे युपीएससीची परीक्षा देणार असल्याचे विरेंद्र याने सांगितले.