Inspiring Story: कन्यारत्न झाल्यास फी माफ, केकही कापतात; असे डॉक्टर ज्यांनी हजारो मुलींना दिलंय जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 09:41 AM2023-03-31T09:41:45+5:302023-03-31T09:43:49+5:30
पुण्याचे डॉ. गणेश राख यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कार्याचं अनेकांकडून कौतुकही होतंय.
डॉ. गणेश राख (Dr Ganesh Rakh) एका मिशनवर आहेत. ते मिशन म्हणजे मुलींना वाचवण्याचं. गेल्या काही वर्षांत त्यांनी स्वत:च्या हातानं हजारो प्रसूती केल्या. जर मुलगी झाली तर ते त्यांच्याकडून एक पैसाही आकारत नाहीत. मुलीचा जन्म झाला तर रुग्णालयातही जल्लोष केला जातो. केक कापून मोठ्या उत्साहात ते सेलिब्रेटही केलं जातं. हे सर्व करण्यामागे एक मोठा उद्देश आहे.
डॉ.गणेश यांनी ते दिवसही पाहिलेत जेव्हा मुलीचा जन्म झाला हे कळल्यानंतर कुटुंबातील सदस्य तिला पाहायलाही येत नव्हते. दुसरीकडे मुलगा झाला की मोठा उत्साह असायचा. यानंतर डॉ. राख यांनी ठरवलं की मुलगी झाली तर त्या कुटुंबीयांकडून पैसे घेणार नाही. एवढंच नाही, जन्मानंतर आई आणि मुलीला जितक्या काळासाठी देखरेखीखाली ठेवलं जातं, त्याचा खर्चही रुग्णालयच करतं. डॉ. गणेश हे आज एक आदर्श ठरले आहेत.
२४०० पेक्षा अधिक मोफत प्रसूती
डॉ. गणेश हे पुण्यातील आहेत. पुण्यातील हडपसरमध्ये त्यांचं मेटर्निटी अँड मल्टीडिसिप्लिनरी हॉस्पीटल आहे. बेटी बचाओ या मोहिमेचं हे रुग्णालय एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आतापर्यंत २४०० पेक्षा अधिक मुलींची मोफत प्रसुती केली आहे. मुलीच्या जन्मानंतर त्यांनी एकही पैसा घेतला नाही. या मोहिमेला त्यांनी बेटी बचाओ जनआंदोलन असं नाव दिलंय. स्त्री भ्रूण हत्येविरोधात ते २०१२ पासून मोहीम चालवत आहेत. अनेक राज्यातील लोकांकडून त्यांना सहकार्यही मिळालंय. यानंतर काही आफ्रिकन देशही त्यांच्यासोबत जोडले गेले. या उपक्रमामुळे आजूबाजूच्या परिसरात स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृती झाली आहे.
जल्लोषात स्वागत
मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतेही पैसे आकारले जात नाही. इतकंच नाही तर तिचं जल्लोषात स्वागत केलं जातं. केक कापून हा आनंद साजरा केला जातो. रुग्णालय फुलं आणि फुग्यांनी सजवलं जातं. मुलगी होणं हीदेखील एक अभिमानाची गोष्ट आहे असं तिच्या पालकांना वाटणं हा त्यामागील उद्देश आहे.
२०१२ मध्ये सुरुवात
डॉ. गणेश यांनी २०१२ मध्ये बेटी बचाओ उपक्रम सुरू केला. त्याची सुरुवात त्यांनी एका विशिष्ट प्रकारची जाणीव झाल्यानंतर केली. तेव्हा त्यांच्या रुग्णालयाचे सुरुवातीचेच दिवस होते. मुलगी झाली की घरातील सदस्यांचे चेहरे कोमेजून जायचे हे त्यांच्या लक्षात आलं. आई आणि मुलीलादेखील भेटायला कोणी आलं नाही असं अनेकदा त्यांच्या निदर्शनास आलं. लोकांनी मुलीच्या जन्मानंतर फी भरण्यास नकार दिल्याचेही प्रकार घडले. परंतु यानंतर त्यांनी मुलगी झाल्यानंतर कोणतीही फी घेणार नाही आणि तिचा जन्म सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला.