अमेरिकेतील नोकरी सोडून 'ते' दूध व्यावसायिक बनले; १२० कर्मचारी अन् ४४ कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 09:44 AM2021-05-17T09:44:54+5:302021-05-17T09:45:28+5:30
किशोर इंदुकुरी यांची प्रेरक कथा : गेल्या वर्षी ४४ कोटींची उलाढाल
हैदराबाद : किशोर इंदूकुरी यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबातील. या वर्गातील अनेकांचे स्वप्न असते तसे त्यांचेही होते ते शिकायचे व नोकरी अमेरिकेत करायची. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत (खरगपूर) त्यांनी पदवी मिळवल्यावर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेटसमधून पदव्युत्तर पदवी आणि पॉलिमर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी मिळवली. त्यानंतर इंदुकुरी यांना इंटेलमध्ये नोकरीही मिळाली.
नोकरी सहा वर्षे केल्यावर किशोर इंदुकुरी यांना आपला खरा ध्यास हा शेती असल्याचे जाणवले. भारतामध्ये त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची कर्नाटकमध्ये काही शेतजमीन आहे. किशोर यानिमित्ताने नेहमी शेतात यायचे आणि शेतकऱ्यांशी चर्चा करायचे. किशोर इंदुकुरी यांनी आपल्या निर्णयाविषयी सांगितले की, ‘मी नोकरी सोडून देऊन माझ्या शेती या मूळ व्यवसायात लक्ष घालायचे ठरवले. हैदराबादला परतल्यावर मला हे जाणवले की, परवडणाऱ्या आणि भेसळ न केलेल्या दुधाला फारच मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. मला बदल घडवायचा होता तो फक्त माझा मुलगा आणि माझ्या कुटुंबापुरताच नाही तर हैदराबादेतील लोकांसाठीही तो घडवायचा होता.’
या पार्श्वभूमीवर इंदुकुरी यांना स्वत:ची डेअरी आणि मिल्क ब्रँड सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
२०१२ मध्ये त्यांनी कोईम्बतूर येथून २० गायी विकत घेतल्या व हैदराबादमध्ये स्वत:चा डेअरी फार्म उभा केला. किशोर इंदुकुरी हे हैदराबाद शहरातील ग्राहकांना थेट दूध पुरवतात. त्यासाठी ग्राहकांना वर्गणीदार व्हावे लागते. २०१६ सालामध्ये सिद फार्म या नावाने ब्रँड अधिकृतपणे नोंदवला गेला. आता त्यांच्याकडे १२० कर्मचारी असून ते १० हजाराहून अधिक ग्राहकांकडे दररोज दूध पुरवतात. गेल्या वर्षी यातून त्यांनी ४४ कोटी रुपयांची उलाढाल केली.