सकाळी प्रोफेसर अन् रात्री हमाली...हैराण करणारी 'या' व्यक्तीची संघर्ष कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 07:45 AM2022-12-10T07:45:20+5:302022-12-10T07:45:38+5:30
ओडिशातील ध्येयवादी व्यक्तीची कथा; विद्यार्थ्यांकडून फीची अपेक्षा नाही
अंबिकाप्रसाद कानुनगो
भुवनेश्वर : गरीब घरातील मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी ओडिशातील गंजम जिल्ह्यात नागेशू पात्रो (३१ वर्षे) यांनी स्टुडंट्स अकॅडमी सुरू केली आहे. त्यात शिकणाऱ्या ५२ मुलांनी फी दिलीच पाहिजे, अशी अट त्यांनी घातलेली नाही. स्वत: नागेशू सकाळी एका कॉलेजमध्ये शिकवितात व रात्री ब्रह्मपूर रेल्वेस्थानकावर हमाल म्हणून काम करतात. त्या कामांतून वेळ काढून ते गरीब घरातील मुलांना शिकवितात.
त्यांचे लहानपण अतिशय कष्टात व गरिबीत केले. शिकण्यासाठी, जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यामुळे गरीब मुलांना शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्या असे मला वाटू लागले असे नागेशू पात्रो यांनी सांगितले. गंजम जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथील मनोहर या गावाचे ते रहिवासी आहेत.
नागेशूच्या यांच्या कमाईवर त्यांचे घर चालते. शालेय जीवनात ते हुशार विद्यार्थी म्हणून नावाजले गेले. पहिली ते पाचवी इयत्तेपर्यंत त्यांनी नेहमी फर्स्ट क्लास मिळविला. ते अकरावी इयत्तेपर्यंत शिकले आहेत. मात्र बारावीच्या परीक्षेची फी भरणे पालकांना शक्य न झाल्यामुळे २००६ साली नागेशू पात्रो ती परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी सुरत शहरात एका मिलमध्ये दोन वर्षे नोकरी केली. मात्र तब्येतीच्या तक्रारींमुळे ते पुन्हा गावी परत आले. २०१२ साली बहि:शाल अभ्यासक्रमाद्वारे त्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यानंतर पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. हे काम करताना ते ब्रह्मपूर रेल्वे स्थानकावर हमाल म्हणून काम करून उरलेल्या वेळात अभ्यास करायचे.
स्वत:च्या कमाईतून शिक्षकांचा पगार
नागेशू पात्रो सेवाभावी वृत्तीने कोचिंग क्लास चालवितात. प्राध्यापक व हमाल म्हणून काम केल्यानंतर जे पैसे मिळतात त्यातून ते क्लासमधील शिक्षकांना पगार देतात. त्यांच्याकडे रेल्वेस्थानकावर हमालीचे काम करण्याचा २०११ सालापासून परवाना असला तरी त्यांना कायम करण्यात आलेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.