फेरिवाल्या बापाला पोलिसांनी कानाखाली मारली; पोरानं न्यायाधीश बनून नाव कमावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 19:00 IST2022-11-16T19:00:23+5:302022-11-16T19:00:37+5:30
कमलेशच्या वडिलांनी चांदणी चौकात पाणीपुरीचा धंदा सुरू केला. त्यावेळी कमलेशनं दहावी पास केली होती

फेरिवाल्या बापाला पोलिसांनी कानाखाली मारली; पोरानं न्यायाधीश बनून नाव कमावलं
पटना - बिहारच्या सहरसा जिल्ह्यात राहणाऱ्या कमलेश कुमारच्या यशाची कहाणी सध्या चर्चेत आहे. कमलेशनं २०२२ च्या बिहार ज्युडिसरी परीक्षेत ६४ वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशात वर्षांची मेहनत आणि वडिलांचा त्याग समाविष्ट आहे. कमलेश कुमार यांच्या वडिलांनी कधी कुलीचं काम केले तर कधी रिक्षा चालवली. रस्त्यावर पाणीपुरीही विकली. एकदा एका पोलिसाने वडिलांना मारलं होतं हीच घटना कमलेश कुमारच्या आयुष्यातील टर्निग पॉईंट ठरली.
कमलेश कुमार सांगतात की, माझे वडील खूप गरीब कुटुंबातून येतात. वडिलांना १० भाऊ बहिण आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांनी दिल्ली गाठली. त्याठिकाणी एका झोपडीत राहत होते. परंतु त्याचवेळी लालकिल्ल्याजवळील झोपड्या हटवण्याचे सरकारने आदेश दिले. सर्व बेकायदेशीर झोपड्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. आम्हाला कुठे राहायचा हा प्रश्न आला. त्यानंतर एकाठिकाणी घर भाड्याने घेऊन जगणं सुरू केले.
त्यानंतर कमलेशच्या वडिलांनी चांदणी चौकात पाणीपुरीचा धंदा सुरू केला. त्यावेळी कमलेशनं दहावी पास केली होती. एकेदिवशी जेव्हा कमलेश वडिलांसोबत पाणीपुरी विकत होता तेव्हा पोलिसाने जबरदस्तीने दुकान बंद करत वडिलांना कानाखाली मारली. या घटनेचा कमलेशच्या जीवनावर मोठा परिणाम झाला. मला खूप राग आला होता परंतु मी काहीच करू शकलो नाही. मग एकदा वडिलांनी मला सांगितले पोलीस न्यायाधीशांना घाबरतात. तेव्हापासून मी न्यायाधीश बनणारच असा निर्धार करत त्यादिशेने वाटचाल सुरू केली.
कमलेश कुमार दिल्ली विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत होते पण वडिलांसोबत घडलेली घटना आठवून त्यांनी न्यायाधीश बनण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी खूप मेहनत घेत तयारी केली. इंग्रजी चांगल्या रितीने बोलायला लागले. २०१७ मध्ये कमलेश कुमार यांनी यूपी न्यायाधीशाची परीक्षा दिली. त्यानंतर बिहार ज्युडिसरीची परीक्षेची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात यश आलं नाही. त्यानंतर कोरोना आला. त्यात ३ वर्ष बर्बाद झाली. परंतु कमलेश यांनी हार मानली नाही. तयारी करत राहिले. अखेर २०२२ मध्ये त्यांचे सिलेक्शन झाले.
कमलेश कुमार यांनी परीक्षेत ६४ वा क्रमांक पटकावला. ते म्हणाले की, जेव्हा मी परीक्षेचा निकाल पाहत होतो तेव्हा मला नाव दिसलं नाही म्हणून हताश होऊन बसलो होतो. तेव्हा माझ्या एका मित्राने फोन करून सिलेक्शन झाल्याचं कळवलं. जे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्यावेळी कमलेश घरी एकटे होते. आई बाजारात गेली होती तर वडील रस्त्यावर पाणीपुरी विकत होते. जेव्हा कमलेशच्या यशाबद्दल घरच्यांना कळालं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"