पोस्टमास्तरचा मुलगा झाला सहायक वनसंरक्षक; मंगेश गिरडकरची भरारी, MPSC उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 07:37 AM2021-10-03T07:37:06+5:302021-10-03T07:37:18+5:30
मंगेश दिवाकर गिरडकर (नांदगाव) असे सहायक वनसंरक्षकपदी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे
अंकुश गुंडावार
गोंदिया : अपयशाने खचून न जाता सातत्याने ध्येयाचा पाठलाग केल्यास निश्चितच यश मिळते. वडिलांचे परिश्रम, कुटुंबाचा त्याग आणि भावंडांचा आधार या सर्वांची जाणीव ठेवत, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशाचा पाठलाग करताना अखेर यश पदरात पडले. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील नांदगाव या छोट्याशा गावातील सेवानिवृत्त पोस्टमास्तरच्या मुलाने ही परीक्षा उत्तीर्ण होत, सहायक वनसंरक्षक पदावर नियुक्त होण्याचा मान पटकाविला.
मंगेश दिवाकर गिरडकर (नांदगाव) असे सहायक वनसंरक्षकपदी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मंगेशचे वडील सेवानिवृत्त पोस्टमास्तर असून, आई गृहिणी, तर दोन भाऊ शिक्षक आहेत. सुरुवातीला परिस्थिती हलाखीची असतानाही खर्चात काटकसर करून काही झाले, तरी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे, हा ध्यास त्याच्या वडिलांनी बाळगला. मंगेशसह महेश आणि नीलेश या दोन्ही भावंडांनीही वडिलांचा त्याग आणि परिश्रमाची पूर्ण जाणीव ठेवीत परिश्रम घेतले. महेश आणि नीलेश हे दोघेही शिक्षक आहेत. मंगेशने प्राथमिक शिक्षण नांदगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल, तर माध्यमिक शिक्षण राजुरा येथून पूर्ण केले. त्यानंतर, चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून तो एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. सुरुवातीला त्याला यात अपयश आले, पण तो निराश झाला नाही.
गावाला कधीही विसरणार नाही
अपयश आले, तरी निराश व्हायचे नाही आणि यश मिळाले, म्हणून भारावून जायचे नाही. परिस्थिती, आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवायची, आपण जिथे शिकून मोठे झालो, त्या गावाला कधीही विसरणार नाही. मी कितीही मोठ्या पदावर गेलो, तरी मु.पो. नांदगाव हे आपल्या मुखात सदैव राहणार आहे, असे मंगेशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सलग आठ ते दहा तास अभ्यास : काहीही झाले, तरी ध्येय गाठायचेच, असा निश्चय करून तयारी केली. अभ्यासात सातत्य ठेवत जिद्द, चिकाटीने कठाेर परिश्रम घेत यशाचा पाठलाग केला. दिवसातून सलग आठ ते दहा तास अभ्यास केला. अखेर या सर्वांचे चीज झाले.
माझ्या कष्टाची मुलांनी केली फुले
मुले आपल्यापेक्षा मोठी व्हावीत, त्यांनी आकाशाला गवसणी घालावी, परिस्थितीची जाणीव ठेवावी, ही प्रत्येकच आई-वडिलांची इच्छा आणि अपेक्षा असते. माझ्या तिन्ही मुलांनी याची जाणीव ठेवीत गाठलेल्या यशाने खरोखरच माझ्या कष्टाची फुले झाल्याचा मला मनापासून आनंद आहे. - दिवाकर गिरडकर (मंगेशचे वडील)