जिद्दीला सलाम! पतीनं सोडलं, झाडू मारून मुलांना सांभाळलं; आता होणार प्रशासकीय अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 07:06 PM2021-07-15T19:06:51+5:302021-07-15T19:13:42+5:30
बिकट परिस्थितीवर मात करून आभाळाला गवसणी; आव्हानांचा सामना करत कठीण परीक्षा उत्तीर्ण
जयपूर: परिस्थिती कितीही बिकट असली, तरीही काही माणसं जिद्द सोडत नाही. नियती अग्निपरीक्षा घेत असते, मात्र त्यातूनही काही जण अगदी ताऊन सुलाखून निघतात. संकटांना थेट भिडणारी आणि आभाळ कोसळलं तरी त्यावर पाय रोऊन उभं राहणारी माणसं इतरांसारखी आदर्श ठरतात. राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेनंदेखील अशीच कामगिरी करून दाखवली आहे. दोन वर्ष रस्त्यावर झाडू मारणाऱ्या आशा कंडारा आता प्रशासकीय अधिकारी होणार आहेत. राजस्थान प्रशासकीय सेवा उत्तीर्ण होत त्यांनी गगनाला गवसणी घातली आहे.
जोधपूर महापालिकेत आशा कंडारा गेल्या २ वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत. लग्नाच्या ५ वर्षांनंतर त्या पतीपासून वेगळ्या झाल्या. दोन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. आशा यांनी नोकरी सांभाळून आधी पदवी परीक्षा दिली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी राजस्थान प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली. परीक्षा दिल्यावर त्यांना निकालासाठी २ वर्षे वाट पाहावी लागली. या कालावधीत त्यांनी सफाई कर्मचारी म्हणून काम केलं.
आशा यांचा विवाह १९९७ मध्ये झाला. २००२ मध्ये त्या पतीपासून वेगळ्या झाल्या. त्यानंतर आशा यांनी प्रशासकीय अधिकारी व्हायचं ठरवलं. अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करत त्यांनी २०१६ मध्ये पदवी परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. दिवसरात्र अभ्यास करून त्यांनी प्री परीक्षा दिली. त्यात यश मिळाल्यानं त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्या मेन्सचा अभ्यास करू लागल्या.
प्रशासकीय अधिकारी होण्याची स्वप्नं डोळ्यात घेऊन आशा जगत होत्या. पण दोन मुलांची जबाबदारी अंगावर होती. परीक्षा दिल्यावर त्यांनी स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी स्वीकारली. पावटाच्या मुख्य रस्त्यावर झाडू मारण्याचं काम त्यांना करावं लागलं. आशा यांनी तेदेखील काम केलं. मंगळवारी राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात आशा उत्तीर्ण झाल्या. प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.