IAS अधिकारी पदाचा राजीनामा देत पत्करली खासगी नोकरी; कोण आहेत रोहित मोदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 02:07 PM2023-04-03T14:07:15+5:302023-04-03T14:07:32+5:30
खासगी क्षेत्रात उतरून त्याठिकाणीही कामानं नावलौकीक केले.
नवी दिल्ली - IAS ची नोकरी सर्वात चांगली आणि उत्तम मानली जाते. प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी मिळवणे सोप्पं नाही. अनेक वर्षांची मेहनत आणि कठीण UPSC परीक्षा पास केल्यानंतर आयएएस नोकरी मिळते. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी १४ वर्ष आयएएस अधिकारी म्हणून काम केले त्यानंतर खासगी नोकरीचा मार्ग स्वीकारला. रोहित मोदी असं या अधिकाऱ्याचे नाव आहे.
रोहित मोदी, आयुष्यातील १४ वर्ष आयएएस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावलं. मोदी यांनी ना केवळ अधिकारी म्हणून स्वत:ला सिद्ध केले तर खासगी क्षेत्रात उतरून त्याठिकाणीही कामानं नावलौकीक केले. मोठ्या कंपन्या, मोठे प्रोजेक्ट यांचं नेतृत्व करणाऱ्या रोहित मोदींचं टॉप सीईओ म्हणून नाव आहे. एल अँड टी आयडीपीएल, सुजलॉन एनर्जी, गॅमन इंडिया, एस्सेल इंफ्रा लिमिटेड या कंपन्यांच्या सीईओपदी राहून त्यांनी कंपनीला यशाच्या शिखरावर पोहचवले.
कोण आहे रोहित मोदी?
माजी आयएएस अधिकारी रोहित मोदी त्या माजी अधिकाऱ्यांपैकी एक आहेत ज्यांनी सरकारी नोकरीनंतर खासगी क्षेत्रातही आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. राजस्थान जयपूरच्या सेंट जेवियर स्कूलमध्ये सुरुवातीचं शिक्षण घेतल्यानंतर रोहित यांनी दिल्लीतील स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पदवीचं शिक्षण घेतले. १९८५ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांची IAS अधिकारी म्हणून निवड झाली. १४ वर्ष ते वेगवेगळ्या विभागात कार्यरत होते.
प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी नागरी विकास, वस्त्रोद्योग, उद्योग आणि वित्त, कोळसा या विभागात काम केले. अर्थ मंत्रालयात काम करत असताना त्यांना IMF आणि IFC चे नोडल ऑफिसर बनवण्यात आले. सर्व काही व्यवस्थित चालले होते. त्यानंतर अचानक १९९९ मध्ये त्यांनी आपल्या IAS नोकरीचा राजीनामा दिला. १४ वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर मोठमोठ्या खासगी कंपन्यांमध्ये सीईओ आणि एमडी म्हणून जबाबदारी सांभाळली.