सौदी अरेबियात उष्णतेच्या लाटेमुळे मृतांची संख्या १००० च्या वर; भारतीयांची आकडेवारी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 06:34 PM2024-06-20T18:34:23+5:302024-06-20T18:39:46+5:30

सौदी अरेबियातील मक्का येथे उष्णतेमुळे या वर्षी हज दरम्यान १,००० हून अधिक यात्रेकरू मरण पावले आहेत.

Saudi Arabia More than 1000 pilgrims have died during the Hajj due to the heat in Mecca | सौदी अरेबियात उष्णतेच्या लाटेमुळे मृतांची संख्या १००० च्या वर; भारतीयांची आकडेवारी आली समोर

सौदी अरेबियात उष्णतेच्या लाटेमुळे मृतांची संख्या १००० च्या वर; भारतीयांची आकडेवारी आली समोर

Hajj 2024 Pilgrims Deaths : जगभरातील देश सध्या भीषण उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. अशातच सौदी अरेबियाच्या कडाक्याच्या उन्हामुळे यंदाच्या हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुचीं मोठी अडचण झाली आहे. सौदी अरेबियामध्ये आतापर्यंत १००० हून अधिक यात्रेकरुंचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियातील मक्का येथे आतापर्यंत १००० हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या मृतांमध्ये भारतीयांचाही समावेश आहे. जगभरातून लाखो मुस्लिम दरवर्षी हज करण्यासाठी मक्केला पोहोचतात. या वर्षी सुमारे १८ लाख लोक हज यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र उष्णतेच्या लाटेमुळे इथली परिस्थिती बिकट बनली आहे. या आठवड्यात मक्कामधील तापमान ५१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.

मक्का हा एक असा प्रदेश आहे जिथे उष्णतेचा कहर फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही दिसून येतो. या ठिकाणचे तापमान हिवाळ्यातही लोकांना अस्वस्थ करते. अशातच आता हज यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरुंना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. माध्यमंच्या वृत्तानुसार, आतापर्यंत मक्काध्ये १० देशांतील १०८१ हाजींच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वाधिक ६५८ लोक इजिप्तमधील होते. याशिवाय भारत, जॉर्डन, इंडोनेशिया, इराण, सेनेगल आणि ट्युनिशिया येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहे.

मक्का येथे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये भारतीयांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मृतांमध्ये ९० भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. यावेळी भारतातून सुमारे दोन लाख लोकांनी हज यात्रेसाठी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीही जवळपास तेवढेच लोक हजला गेले होते. दुसरीकडे अनेक यात्रेकरू बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. बेपत्ता झालेल्या यात्रेकरुंना शोधण्यात मोठी अडचण येत आहे. बेपत्ता हज यात्रेकरूंचे नातेवाईक रुग्णालयात त्यांच्या प्रियजनांचा शोध घेत आहेत.

हज अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना छत्री वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुरेसे पाणी प्यावे आणि दिवसातील सर्वात उष्ण तासांमध्ये सूर्यप्रकाश टाळण्याची सूचना केली आहे. सौदी लष्कराने यात्रेकरूंच्या मदतीसाठी १६०० हून अधिक सैनिक तैनात केले आहेत. त्याचबरोबर ३० जलद कृती पथकेही तैनात करण्यात आली आहेत. ५ हजारांहून अधिक स्वयंसेवकही तैनात करण्यात आले आहेत.

उष्णता वाढण्याचे कारण काय?

या भागातील तापमान दर १० वर्षांनी ०.४ अंश सेल्सिअसने वाढत असल्याचे अभ्यासातून समोर आलं आहे. सौदी नॅशनल सेंटर फॉर मेट्रोलॉजीच्या म्हणण्यानुसार, मक्काच्या आसपास उष्णता आणि दमछाक करणारे उष्ण हवामान अनुभवले जात आहे. मक्का सौदी अरेबियाच्या दक्षिणेला आहे. त्यामुळे उत्तर व मध्य भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून हे ठिकाण वंचित आहे. मक्केच्या हवामानावरही लाल समुद्राचा प्रभाव दिसून येतो. संध्याकाळच्या वेळी, समुद्राची वारे किनारपट्टी आणि आजूबाजूच्या भागात गरम करतात. त्याचा परिणाम या भागातही दिसून येत आहे.
 

Web Title: Saudi Arabia More than 1000 pilgrims have died during the Hajj due to the heat in Mecca

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.