लॉकडाऊनमध्ये १० हजारांची नोकरी गेली, पण ‘हा’ पठ्ठ्या आता महिन्याला ८० हजार कमवतो
By प्रविण मरगळे | Published: October 24, 2020 09:29 AM2020-10-24T09:29:06+5:302020-10-24T09:31:22+5:30
Mahesh Kapse Artist News: ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत, लॉकडाऊनमध्ये मोकळ्या वेळेमुळे त्याचे आयुष्य बदलले. व्यवसायाने चित्रकला शिक्षक असलेल्या महेश कापसे यांनी यावेळी आपली चित्रे सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली
औरंगाबाद – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनामुळे जगावर दहशतीचं सावट पसरलं, लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काम सुटल्यानंतर मोठ्या संख्येने लोकांना संकट आणि समस्यांना सामोरे जावे लागलं परंतु या अडचणींमध्ये असा एक माणूस आहे जो लॉकडाऊनच्या आधी महिन्यात १० हजार रुपये कमवत असे, पण लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर आता तो महिन्याकाठी ८० हजारांची कमाई करतो.
ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत, लॉकडाऊनमध्ये मोकळ्या वेळेमुळे त्याचे आयुष्य बदलले. व्यवसायाने चित्रकला शिक्षक असलेल्या महेश कापसे यांनी यावेळी आपली चित्रे सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली. त्याची चित्रं इतकी लोकप्रिय झाली की, सिनेमातील कलाकारही या चित्रकाराचे चाहते बनू लागले. बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख यानेही महेशचं कौतुक केलं आहे. सध्या महेश दरमहा सुमारे ८० हजार रुपये कमवत आहे.
मार्च-एप्रिलपूर्वी महेश कापसे यांना फारसं कोणी ओळखत नव्हते. ते औरंगाबाद येथील एका शाळेत चित्रकला शिक्षक होते. कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन जाहीर झाला, त्यानंतर काही दिवसांनी शाळेची नोकरी गेली. महेशही त्यांच्या बुलढाणा येथील गावी परतला. मोकळ्या वेळेत काय करायचं हा प्रश्न महेशला पडला असताना त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून या वेळेचे सदुपयोग केला. स्वत: केलेली पेटिंग्स टिकटॉकवर अपलोड करू लागले. त्यानंतर महेशचे आयुष्यच बदलले.
हळूहळू महेश कापसे सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागला. सेलिब्रिटीसुद्धा त्याच्या कलेचे चाहते बनले. महेशला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळू लागली. क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर, केव्हिन पीटरसन यांनी त्याचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. बड्या मराठी कलाकारांनी महेश यांच्या चित्रकलेचे कौतुक केले. महेशने सांगितले की, सुरुवातीला मी माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांचे चित्र काढण्यास सुरुवात केली, त्यातून बऱ्याच ऑर्डर मिळाल्या. एका दिवसात २-२,३-३ ऑर्डर येऊ लागल्या. सोशल मीडियात फेमस झाल्यापासून महेशला महिन्याकाठी ४० पर्यंत ऑर्डर मिळतात आणि प्रत्येक पेटिंग्ससाठी ते २ हजार रुपये घेतात, तर पेंटिंग करण्यास महेशला फक्त १० मिनिटे लागतात.
महेशची आजी पार्वती सांगतात की, तो माझा नातू आहे, पेंटिंग्स करून त्याचे प्रगती केली. चित्रकलेत त्याला मिळालेल्या प्रसिद्धीबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्याला अनेक पुरस्कारही मिळत आहेत. माझा नातू इतका पुढे जाईल याचा विचार केला नव्हता, पण आज तो जे काही आहे स्वत:च्या कर्तुत्वावर आहे. महेश यशवंतराव आर्ट कॉलेजच्या क्लासमध्ये नेहमीच पहिले आले, परंतु त्यांच्या टँलेंटला आता लॉकडाऊन दरम्यान प्रसिद्धी मिळू लागली आहे. टिक टॉक बंद झाल्याने महेशच्या कामावर परिणाम झाला आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टिकटॉकसारखं यश मिळत नाही. पण प्रयत्न करण्यास महेश मागे हटला नाही.