ट्रॉली रिक्षा ओढणाऱ्याचा मुलगा बनणार डॉक्टर; NEET परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 01:07 PM2021-11-08T13:07:10+5:302021-11-08T13:07:27+5:30

मुर्सीद एका गरीब कुटुंबातील असून त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह  करतात.

Success Story of Odisha Riksha pullar Son Passed in NEET Exam | ट्रॉली रिक्षा ओढणाऱ्याचा मुलगा बनणार डॉक्टर; NEET परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

ट्रॉली रिक्षा ओढणाऱ्याचा मुलगा बनणार डॉक्टर; NEET परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

Next

NEET Exam: ओडिशा इथं रिक्षाचालकाच्या मुलानं NEET परीक्षेत यश मिळवत सगळ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. आता डॉक्टर बनून तो स्वत:चं आणि त्याच्या कुटुंबाचं नशीब बदलण्यासाठी तयार आहे. ओडिशातील १८ गरीब मुलांनी NEET परीक्षेत यश मिळवलं आहे. ज्यांचे कुटुंब दूधविक्री करतं तर कुणी रिक्षा चालवतं. ओडिशाच्या भूवनेश्वर येथील जिंदगी फाऊंडेशन शैक्षिणक संस्थेने या मुलांना जगण्याचं बळ दिलं. या फाऊंडेशनच्या १८ मुलांनी NEET परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

भद्रकच्या काजी महल येथील ट्रॉली रिक्षाचालक मैराज खान याच क्षणाची वाट पाहत होते जेव्हा त्यांचा मुलगा मुर्सीद वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र परीक्षेत यश मिळवेल. मुर्सीदने नीटच्या परीक्षेत देशात १५२३९ क्रमांक पटकावला. चौथ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. नीट परीक्षा पास करणारा तो परिसरातील पहिलाच मुलगा आहे. जिंदगी फाऊंडेशननं या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत केली होती. वंचित समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं उदिष्ट या संस्थेचे आहे.

नीट प्रवेश परीक्षेत मुर्सीदने ६१० गुण मिळवले. मुर्सीद एका गरीब कुटुंबातील असून त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह  करतात. त्याचसोबत दूध विक्रेत्याचा मुलगा असलेल्या सुभाष चंद्र बेहराने ५९५ गुण मिळवत नीट परीक्षेत यश संपादन केले आहे. या फाऊंडेशनमधील विद्यार्थिनी शिवानी मेहरनं NEET परीक्षेत ५७७ गुण मिळवले आहेत. मुर्सीदच्या या यशाने त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुर्सीदचे वडील मैराज खान म्हणाले की, २००७ मध्ये माझा अपघात झाल्यानंतर माझ्या मुलाचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न तुटलं होतं. परंतु माझ्या मोठ्या मुलाने भावाला डॉक्टर बनवण्यासाठी अपार मेहनत घेतली.

त्याचसोबत अजय बहादूर सिंह यांनी जिंदगी फाऊंडेशनच्या मदतीने मुलाला शैक्षणिक मदत केली त्यामुळे मुलानं हे यश मिळवलं. आज त्यांच्या मदतीविना माझ्या मुलाचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं नसतं. मुलाने जे यश मिळवले त्यात संस्थेचा मोठा वाटा आहे असं वडिलांनी सांगितले. मुर्सीदने सांगितले की, मी एका गरीब कुटुंबातून येतो. मी डॉक्टर बनावं अशी माझ्यासह कुटुंबाची इच्छा होती. आज मी माझ्या स्वप्नाच्या दिशेने पाऊल टाकलं आहे.  

Web Title: Success Story of Odisha Riksha pullar Son Passed in NEET Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.