आईनं धुणीभांडी करून लेकराला शिकवलं, मुलानं कष्टाचं चीज केलं; फोर्ड कंपनीत बनला इंजिनिअर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 02:11 PM2021-07-28T14:11:28+5:302021-07-28T14:12:12+5:30
स्वप्नं प्रत्येक जण पाहतो, पण ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो असं नाही. जो मनानं सर्वस्व झोकून देऊन स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतो त्याला त्याचं फळ मिळतंच.
स्वप्नं प्रत्येक जण पाहतो, पण ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो असं नाही. जो मनानं सर्वस्व झोकून देऊन स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतो त्याला त्याचं फळ मिळतंच. याची अनेक उदाहरणं आपण आजवर पाहिली आहेत. उदयपूरच्या अशाच एका मुलानं आपल्या आईच्या कष्टाचं चीज केलं आहे.
भावेश लोहार नावाचा उदयपूरला राहणाऱ्या तरुणाच्या आईनं लोकांच्या घरी धुणीभांडी करुन आपल्या लेकरालं शिकवलं. मुलानं आज आपल्या यशाची कहाणी लिंक्डनवर शेअर केली आहे. जी आज प्रचंड व्हायरल झाली आहे. आपल्या समोरील अनेक अडचणींवर मात करुन भावेश आज जगातील सुप्रसिद्ध फोर्ड मोटर्स कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर कार्यरत आहे.
पायात घालायला चपलाही नव्हत्या
भावेश लोहार यांनी आपल्या लेखात त्याच्या लहानपणीच्या आणि शालेय जीवानाच्या काही आठवणी कथन केल्या आहेत. "मला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा मी अनवाणी पायांनी हायवेवरुन चालत सरकारी शाळेत शिक्षणासाठी जात होतो. माझे मित्र फ्यूचर कार बाबत चर्चा करायचे. एक दिवस मोठा माणूस होऊन स्पोर्ट्सकार खरेदी करण्याची स्वप्नं आम्ही पाहायचो. त्यावेळीपासूनच मला फोर्डच्या फीगो गाडीची प्रचंड आवड होती. मी एका स्थानिक वृत्तपत्रात ती कार पाहिली होती आणि पैसे आल्यावर ती खरेदी करणार असं ठरवलं होतं", असं भावेशनं सांगितलं.
भावेशचं महाविद्यालयीन शिक्षण नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी भोपाळ येथून झालं आहे. त्यावेळी भावेशला हॉस्टेल सोडावं लागलं होतं. कारण कोरोना काळात भावेश आपल्या कुटुंबातील सात सदस्यांसह ६ बाय ६ च्या खोलीत एकत्र राहात होता. "आमच्याकडे एकच खोली होती, यातच मी माझा अभ्यास आणि मुलाखती दिल्या. मी अतिशय भाग्यवान आहे की अनेक बड्या कंपन्यांसाठीच्या मुलाखती मी या लहान खोलीतून दिल्या आहेत अन् याच खोलीतून माझं फोर्ड कंपनीत सिलेक्शन झालं", असं भावेश सांगतो.
बहिणीनं दिली साथ
आजच्या यशाचं सारं श्रेय भावेश आपली मोठी बहिणी आणि आईला देतो. त्याची आई लोकांच्या घरी धुणीभांडी करायची आणि वडील दरमहा ७ हजार रुपये कमाई करायचे. पण लोकांचं कर्ज फेडण्यासाठी कुटुंबातील सर्वांनाच काम करावं लागलं. "आपलं काम इमानदारीनं करत राहा, सकारात्मक विचार करत राहा कारण देवानं तुमच्यासाठी नक्कीच काही ना काही चांगलं करुन ठेवलं असणार आहे", असं मोठ्या सकारात्मक ऊर्जेनं भावेश म्हणतात.