कधीकाळी २०० रुपये मजुरीसाठी वणवण भटकायचे अन् आता लखपती झाले शेतकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:41 AM2023-05-30T11:41:58+5:302023-05-30T11:42:43+5:30
पावसाळी वातावरणात अनेक गावकरी शेती करायचे परंतु त्यातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागत नव्हता.
हजारीबाग - झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील चर्चू आणि धारी भागातील अनेक शेतकऱ्यांचे नशीब आता बदलत आहे. या दोन्ही परिसरातील विविध गावात बहुतांश लोक २०१५ च्या आधी मजुरीच्या शोधात वणवण फिरत होते. त्यात अनिल हेम्ब्रम आणि महिमा मुर्मू यांचाही सहभाग होता. उत्पन्नाचे कुठलेही साधन नव्हते त्यामुळे कामाच्या शोधात गाव-शहरात मजुरीवर निर्भर राहावे लागायचे. हलाखीच्या परिस्थिती गावकऱ्यांना २ वेळचे जेवण मिळायचे.
पावसाळी वातावरणात अनेक गावकरी शेती करायचे परंतु त्यातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागत नव्हता. त्यामुळे गावकऱ्यांपैकी अनेकांनी शहराकडे स्थलांतर केले होते. मात्र आता या गावांचे चित्र बदलले आहे. चर्चूच्या महिमा मुर्म सांगतात की, सुरुवातीला शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. परंतु ग्रीनहाऊस तंत्रज्ञानाने आता हा त्रास दूर झाला आहे. पाणीही कमी प्रमाणात लागते. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत शेती करणाऱ्यांचे उत्पन्न ७० हजार ते १ लाखापर्यंत होत आहे. याआधी घर कुटुंब चालवण्यासाठी मजुरीवर निर्भर राहावं लागायचे.
ग्रीनहाऊस तंत्रज्ञानाने वर्षभर शेती करणे शक्य
ग्रीनहाऊस तंत्रज्ञानाने शेती केल्याने नशीब बदलले. पूर्वीची शेती फक्त पावसाळ्यातच शक्य होती. मात्र आता प्रत्येक हंगामात शेती करणे शक्य झाले आहे. ग्रीन हाऊस तंत्रज्ञानाने शेती केल्याने प्राण्यांपासून संरक्षणही शक्य होते. पूर्वी जनावरांमुळे पिकांचे खूप नुकसान होत असे. या शेतकऱ्यांकडून दरवर्षी टोमॅटो, मिरजेसह अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्यांची लागवड केली जात आहे असं धारी भागातील अनिल हेम्ब्रमने सांगितले.
हैदराबादस्थित संस्था 'शेती' आणि सिनी टाटा ट्रस्टच्या मदतीने चर्चू, धारी परिसरातील शेतकऱ्यांना 'लखपती' बनवण्याची योजना सुरू करण्यात आली. सिनी टाटा ट्रस्टचे अभिजीत जाना म्हणाले की, २०१५ मध्ये लहान शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी संस्थेने विशेष पुढाकार घेतला होता. पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत असत, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते आणि नफाही फारसा मिळत नव्हता. हे लक्षात घेऊन हैदराबादच्या 'शेती' या संस्थेने छोट्या शेतकऱ्यांना ग्रीनहाऊस तंत्रज्ञानाची सुविधा व मदत उपलब्ध करून दिली. त्याच्या मदतीने आता दोन्ही भागातील डझनभर शेतकरी 'लखपती' शेतकरी श्रेणीत आले आहेत.