मूकबधीर बनून खोडकर मुलींना धडा शिकवला तेव्हा...; स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील प्रेरक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 16:20 IST2022-11-02T16:20:03+5:302022-11-02T16:20:51+5:30
Swami Vivekanand Inspirational Story: एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या ज्वलंत विचारांचा पगडा आजच्या तरुणांवरही दिसून येतो.

मूकबधीर बनून खोडकर मुलींना धडा शिकवला तेव्हा...; स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील प्रेरक घटना
Swami Vivekanand Inspirational Story: एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या ज्वलंत विचारांचा पगडा आजच्या तरुणांवरही दिसून येतो. विचार करायला लावतील, अशा प्रेरक विचारांची पेरणी करणारे व्यक्तीमत्व म्हणून स्वामी विवेकानंद यांची ओळख होती. त्यांनी भारतीय वेद-पुराण आणि दर्शनशास्त्राला जागतिक पातळीवर नेलं. त्यांचं संपूर्ण जीवनच प्रत्येकासाठी प्रेरणास्थान असंच आहे. त्यांनी दिलेले मोलाचे सल्ले आजही तरुणांसाठी मार्गदर्शक ठरतात आणि भविष्यातही ठरतील यात शंका नाही. स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील काही प्रसंग आहेत की जे सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. अशीच एक घटना आहे की ज्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे.
स्वामी विवेकानंद यांनी खोडकर मुलींना असा शिकवला धडा
विवेकानंद केवळ अध्यात्मिक गुरू नव्हते. तर ते एक अद्भूत बुद्धीमत्तेचे धनी देखील होते. एकदा ते ट्रेननं प्रवास करत होते. त्यांनी घातलेल्या मनगटी घड्याळावर काही खोडकर मुलींचं लक्ष गेलं. त्या मुलींनी विवेकानंद यांच्या सर्वसामान्य पोशाखावरुन खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. गपचूप तुझं घड्याळ दे नाहीतर गार्डला बोलावून आम्ही तुझी तक्रार करू, असं त्या मुलींनी थेट विवेकानंद यांना धमकावण्यास सुरुवात केली. स्वामी विवेकानंद काहीच बोलले नाहीत. ते शांत राहिले.
विवेकानंद यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेचा वापर केला. ते शांत राहिले आणि त्यांनी मूकबधीर असल्याचं अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलींना इशारा केला की त्यांना काहीच ऐकू येत नाहीय. तुम्ही जे बोलताय ते मला लिहून दाखवा तरच कळेल असं हातवारे करुन सांगू लागले. मुलींनीही त्यांचं म्हणणं एका कागदावरुन लिहून विवेकानंद यांना दिलं. विवेकानंद यांना जे हवं होतं अगदी तसंच घडलं. यानंतर विवेकानंद यांनी मोठ्या आवाज दिला आणि गार्डला बोलावलं. गार्डकडे चिठ्ठी देऊन मला या मुलींची तक्रार करायची आहे असं म्हटलं आणि मुलींच भांड उघडं पडलं.