कर्ज घेऊन UPSC ची तयारी, शिक्षणासाठी शेकडो किमी पायपीट; संघर्षातून बनले IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:32 PM2024-07-24T12:32:17+5:302024-07-24T12:33:36+5:30
वीरच्या वडिलांनी मुलाला यूपीएससीची तयारी करायची आहे त्यासाठी व्याजावर पैसे घेतले. त्यांची सर्व कमाई घरच्या गरजा पूर्ण करण्यास जात होती.
कुटुंबाची परिस्थिती हालाखीची, परंतु काहीतरी करून दाखवण्याची जिद्द उराशी होती. शिक्षणासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागली. एकवेळ अशी आली की शिक्षणासाठी कर्ज घ्यावं लागलं. ही कहाणी आहे वीर नावाच्या युवकाची. ज्याने संघर्षातून वाट काढून यशाकडे झेप घेतली आहे. "मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है, पंख से कुछ नही होता, हौसलो से उडान होती है" ही हिंदीतील म्हणं या युवकाच्या आयुष्यात चपखल बसते.
उत्तर प्रदेशातील छोट्या गावात दलपतपूर येथे राहणाऱ्या वीर प्रताप सिंह राघवनं यशाचं शिखर गाठलं. अनेक अडचणी, समस्यांचा डोंगर पार करत त्याने यूपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केले. वीरची यूपीएससीची कहाणी अनेक स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या युवकांना प्रेरणादायी आहे. UPSC परीक्षेत वीर प्रताप सिंहनं ९२ वा क्रमांक पटकावला. सुरुवातीला आर्य समाज स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ६ वी ते १० वीपर्यंत शिकारपूरच्या सरस्वती विद्या मंदिरात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शाळेत जाण्यासाठी घरापासून ५ किलोमीटर अंतर होतं. त्यावेळी गावात पूल नव्हता, त्यामुळे नदी ओलांडून त्यांना शाळेत जावं लागत होते.
वीरच्या वडिलांनी मुलाला यूपीएससीची तयारी करायची आहे त्यासाठी व्याजावर पैसे घेतले. त्यांची सर्व कमाई घरच्या गरजा पूर्ण करण्यास जात होती. मात्र तरीही मुलावर वडिलांनी पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याला परीक्षेसाठी आर्थिक मदत केली. वीरचे वडील गावात शेती करतात. अलीगड येथे महाविद्यालयात वीर यांनी मॅकेनिकल इंजिनिअर शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअर फिल्ड असूनही त्यांनी UPSC तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात वीर यांना अपयश आलं. मात्र जिद्द न हरता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षेला बसले त्यातही यश मिळालं नाही. २ प्रयत्नानंतर त्यांनी आणखी मेहनत घेतली आणि परीक्षेत यशस्वी झाले. दरम्यान, वीर प्रताप सिंह यांच्या मोठ्या भावाचंही आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी सीआरपीएफमध्ये नोकरी स्वीकारली.