बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करते महिला, मृत्यूनंतर सन्मान देण्यासाठी प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 02:54 PM2023-06-12T14:54:16+5:302023-06-12T14:54:40+5:30
वर्षा वर्मा असे त्यांचे नाव असून त्या लखनौ येथील रहिवासी आहेत
लखनौ: मृत्यूनंतर मृतदेहावर सन्मानाने अंत्यसंस्कार व्हायला हवे. मात्र, विविध कारणांमुळे अनेक मृतदेह बेवारस पडलेले असतात. अशा बेवारस मृतदेहांवर एक महिला अंत्यसंस्कार करते, जेणेकरून त्यांना सन्मानपूर्वक अंतिम निरोप मिळू शकेल. वर्षा वर्मा असे त्यांचे नाव असून त्या लखनौ येथील रहिवासी आहेत. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हा त्यांचा आता नित्यक्रम बनला आहे.
या सेवाकार्याबाबत वर्मा म्हणाल्या की, शवागारात अनेक दिवस मृतदेह पडून राहतात. मला वाटते की कोणत्याही व्यक्तीला सन्मानपूर्वक अंतिम निरोप मिळाला पाहिजे. शवविच्छेदनानंतर बेवारस मृतदेहाला ७२ तास शवागारात ठेवले जाते व नंतर तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी माझ्याकडे दिला जातो. (वृत्तसंस्था)
अशी मिळाली प्रेरणा
अंत्यसंस्काराचे हे असामान्य सेवाकार्य करण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, जेव्हाही मी वृत्तपत्रात नदीतील बेवारस मृतदेह आणि त्यांच्याविषयीच्या उदासीनतेचे वृत्त वाचायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. त्यातूनच या क्षेत्रात काम करण्याची कल्पना सुचली. यासाठी मला माझे मित्र आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळाला.
एका आठवड्यात त्या सरासरी तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात, असे त्यांनी सांगितले. मी आतापर्यंत हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यात त्या मृतदेहांचाही समावेश आहे, ज्यांच्यावर मी कोरोना महामारीदरम्यान अंत्यसंस्कार केले. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराला योग्य सन्मान मिळावा, असे वर्मा यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी ही नि:शुल्क सेवा सुरू केली.
एक कोशिश ऐसी भी...
वर्मा गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत. त्या ‘एक कोशिश ऐसी भी’ नावाची संघटना चालवतात. ही संघटना गरजू लोकांना मदत करते. त्या म्हणाल्या की, केवळ अंत्यसंस्कारच नाही तर आमची संघटना संपूर्ण राज्यात रुग्णांना नि:शुल्क रुग्णवाहिका आणि उपचाराची सुविधा पुरवते. सध्या माझ्याकडे स्वत:च्या तीन रुग्णवाहिका आहेत. गरज भासल्यास आम्ही रुग्णवाहिका भाड्यानेही घेतो. कोरोना महामारीच्या काळात मृतदेहांना शवागारात नेण्यासाठी आम्ही पाच रुग्णवाहिका किरायाने घेतल्या होत्या. ही सर्व सेवा नि:शुल्क आहे आणि त्या कधी-कधी सोशल मीडियावर आर्थिक मदतीचे आवाहन करतात.