Coronavirus: डेल्टाकडून कोरोनाचा कांजण्यांसारखाच फैलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 08:38 AM2021-07-31T08:38:43+5:302021-07-31T08:39:14+5:30
Coronavirus: ज्याप्रमाणे कांजण्या साथीचा झपाट्याने फैलाव होतो, त्याच वेगाने डेल्टा विषाणूमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या ख्यातनाम आरोग्य संस्थेने म्हटले आहे.
वॉशिंग्टन : ज्याप्रमाणे कांजण्या साथीचा झपाट्याने फैलाव होतो, त्याच वेगाने डेल्टा विषाणूमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या ख्यातनाम आरोग्य संस्थेने म्हटले आहे.
याबाबतचे वृत्त अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले लोक देखील डेल्टा विषाणूच्या संसर्गाचा प्रसार करू शकतात. हा विषाणू सर्वप्रथम भारतामध्ये आढळून आला होता. लस न घेतलेल्यांप्रमाणेच लस घेतलेल्या लोकांकडूनही कोरोना विषाणूच्या डेल्टा या प्रकाराचा प्रसार होतो.
कोरोनाविरोधी लढ्याचे बदलले स्वरूप
सीडीसीने म्हटले आहे की, डेल्टा विषाणूमुळे कोरोनाविरोधातील लढाईचे स्वरूप बदलले आहे. या विषाणूपासून सर्वांनीच सावध राहावे.
हा विषाणू अमेरिकेत आणखी थैमान घालू शकतो, असा इशारा या संस्थेने दिला आहे. अमेरिकेत १६.२ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. मात्र, दर आठवड्याला त्यातील ३५ हजार जणांना कोरोना आजारसदृश लक्षणे आढळून येत आहेत.