पाकिस्तानमध्ये आठ वर्षांच्या हिंदू मुलावर दाखल झाला ईशनिंदेचा गुन्हा, होणार फाशीची शिक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 09:22 AM2021-08-10T09:22:32+5:302021-08-10T09:30:40+5:30
Hindu in Pakistan: पाकिस्तानमध्ये ८ वर्षांच्या हिंदू मुलावर कट्टरवाद्यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी ईशनिंदेचा गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी वयाच्या मुलावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इस्लामाबाद -काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये कट्टरवाद्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ला (attack on Hindu Mandir in Pakistan) करून देवदेवतांच्या मूर्तींची तोडफोड करून मंदिरांचे नुकसान केले होते. दरम्यान, या तोडफोडीच्या प्रकारासाठी कारणीभूत ठरलेल्या ८ वर्षांच्या हिंदू मुलावर कट्टरवाद्यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी ईशनिंदेचा गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी वयाच्या मुलावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, रहीम खान यार परिसरात मंदिरामध्ये विध्वंस झाल्यानंतर या मुलाचे कुटुंबीय भीतीने लपले आहेत. तर हिंदू समजातील अन्य कुटुंबे येथून सुरक्षित ठिकाणी गेली आहेत. (An eight-year-old Hindu boy has been charged with blasphemy in Pakistan)
या मुलाची मानसिक स्थिती ही बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. या मुलाने एका मदरशामध्ये जाऊन लघुशंका केली होती. त्यानंतर स्थानिक मौलानाने मुस्लिम कट्टरपंथीयांना चिथावणी दिली. त्यामुळे संतप्त कट्टरपंथीयांनी कारवाईसाठी पोलिसांवर दबाव आणला. या दबावासमोर झुकत पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. मात्र नंतर त्याला सोडण्यात आले. मुलाची सुटका झाल्यानंतर कट्टरवादी अधिकच भडकले. त्यांनी शेकडोंच्या संख्येने मंदिरावर हल्ला करून मंदिराची मोडतोड केली.
मुस्लिम कट्टरवाद्यांनी मंदिरातील मूर्ती तोडल्या. तसेच मंदिराला आग लावली. त्यानंतर पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेत आरोपींना अटक करण्याचे आणि मंदिराची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तसेच मंदिराच्या आसपासच्या परिसरात सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. त्यानंतरही या मुलावर ईशनिंदेचा गुन्हा लागू असून, त्याने जाणूनबुजून मदरश्याच्या पवित्र पुस्तके ठेवलेल्या वाचनालयात जाऊन चटईवर लघुशंका केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
ईशनिंदेच्या कायद्यामुळे मुलाला आता मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. ब्रिटिश वृत्तपत्र गार्डियनने मुलाच्या कुटुंबीयांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, या मुलाला ईशनिंदा कायद्याबाबत अद्याप काही माहिती नाही आहे. त्याला चुकीच्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात फसवण्यात आले आहे. तसेच त्याला तुरुंगात का ठेवण्यात आले आहे हेसुद्धा त्याला कळत नाही आहे. आम्ही आमची दुकाने सोडली आहेत, तसेत संपूर्ण हिंदू समाज बदल्याच्या कारवाईमुळे भयभीत आहे.
या मुलाच्या नातेवाईकाने सांगितले की, आम्ही आता त्या परिसरात जाऊ इच्छित नाही. दोषींवर कुठली कारवाई होईल किंवा अल्पसंख्याकांना संरक्षण मिळेल, असे आम्हाला वाटत नाही. दरम्यान, अवघ्या आठ वर्षांच्या मुलावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल झाल्याने कायदेतज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या कमी वयात ईशनिंदेचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असावी. पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी कट्टरवाद्यांकडून ईशनिंदा कायद्याचा वापर नेहमीच केला जात असतो.