‘साहेबां’ना भारताचे जशास तसे उत्तर; ब्रिटनमधून येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 06:08 AM2021-10-02T06:08:14+5:302021-10-02T06:08:41+5:30
भारतानेही ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध लावून ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे.
नवी दिल्ली : ब्रिटनने काेराेना प्रतिबंधक लस काेविशिल्ड घेतलेल्या भारतीय प्रवाशांवर निर्बंध लावले हाेते. त्यास भारतानेही ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध लावून ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे. ब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला १० दिवस सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे, तसेच ८ दिवसांनी आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियम ४ ऑक्टाेबरपासून लागू हाेणार आहेत.
ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी केंद्र सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरीही या नियमांचे पालन करावे लागणार आहे. सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, प्रवाशांना १० दिवस सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे, तसेच त्यांना भारतात येताना ७२ तासांपूर्वी आरटी-पीसीआर निगेटिव्ह चाचणी रिपाेर्ट आणि लसीकरण प्रमाणपत्र साेबत ठेवणे आवश्यक आहे. ब्रिटनच्या आडमुठ्या निर्बंधाला हे भारताने दिलेले प्रत्युत्तर असल्याचे म्हटले जात आहे.
लसीकरण प्रमाणपत्राच्या मान्यतेला दिलेला नकार
ब्रिटनने भारतातील डिजिटल लसीकरण प्रमाणपत्रावर अविश्वास दाखवून त्यास मान्यता देण्यास नकार दिला हाेता.
हा वाद साेडविण्यात अपयश आल्यानंतर भारतानेही समांतर कारवाईचा इशारादिला हाेता.
त्यानंतर ब्रिटनने एक पाऊल मागे घेत काेविशिल्ड घेतलेल्यांना १५ दिवस सक्तीचे क्वारंटाईन बंधनकारक केले हाेते.