नारायण इंगळे नावाचा अनाथ बालक, झाला वनांचा पालक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 08:12 AM2021-10-02T08:12:21+5:302021-10-02T08:12:55+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गुणवत्तेवर वनक्षेत्रपालपदी निवड.
संदीप शिंदे
लातूर : अनाथ असलेला नारायण इंगळे हा बालपणी रेल्वेने भटकत होता. तेव्हा पोलिसांनी त्यास शासकीय निरीक्षणगृहात पाठविले. तिथेच राहून त्याने अभियांत्रिकीतील पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर एमपीएससी परीक्षेची तयारी केली आणि त्यातही भरारी घेतल्याने वनक्षेत्रपालपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने लागू केलेल्या अनाथ आरक्षणाचा तो पहिला लाभार्थी ठरला.
मूळचा बीड जिल्ह्यातील जोडवाडी येथील रहिवासी असलेल्या नारायणचे आई-वडिलांचे छत्र बालपणीच हरवले. त्यामुळे नारायण रेल्वेनेच भटकंती करत असे. जालना आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील सातवणा रेल्वेस्टेशनवर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन जालना येथील बाल निरीक्षणगृहात पाठविले. तेथे दीड वर्ष राहिल्यानंतर मुरुड येथील जवाहर मुलांचे कनिष्ठ बालगृहात अधीक्षिका सिंधुताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. परभणी येथील तंत्रनिकेतनमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.
औरंगाबाद येथील श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीईची पदवी प्राप्त करीत एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. पण अधिकारी होण्याची मनीषा असल्याने नारायणने लातूर आणि पुणे येथे मित्राकडे राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्यातच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी ओळख झाल्याने त्यांच्याकडेच नारायणने कार्यालयीन सहायक म्हणून नोकरी सुरू केली. त्यांनी स्वत:च्या निवासस्थानी नारायणची राहण्याची व्यवस्था केली. कार्यालयीन काम करीत अभ्यासाला प्राधान्य देत नारायणने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेमधून त्याची वनक्षेत्रपालपदी निवड झाली. २ एप्रिल २०१८ रोजी राज्य सरकारने अनाथ मुलांसाठी शासकीय नोकरीत दिलेल्या अनाथ आरक्षणाचा तो पहिला लाभार्थी ठरला.
अनाथ म्हणून खचून जाऊ नका...
प्रत्येक अनाथ मुलाच्या मनात आई-वडील नसल्याची खंत असते. मात्र, खचून न जाता आयुष्याची लढाई जिंकणे महत्त्वाचे असते. अनाथांना नोकरीत आरक्षण देण्यात आले आहे. हा आशेचा किरण आहे. कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा असेल तर यशाला नक्कीच गवसणी घालता येते.नारायण इंगळे, अनाथ आरक्षणाचा पहिला लाभार्थी