UPSC Topper Shubham Kumar : सहावीत असताना 'असं' काही घडलं की IAS टॉपर शुभमचं आयुष्यच बदललं; 'ती' घटना ठरली टर्निंग पॉईंट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 02:54 PM2021-09-25T14:54:44+5:302021-09-25T15:09:47+5:30
UPSC Topper Shubham Kumar : शुभम सहावीत असताना त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्याचं आयुष्यच बदललं आहे. शुभमने आपल्या मुलाखतीतून यशाची रहस्यं उलगडली.
नवी दिल्ली - यूपीएससी लोकसेवा परीक्षा 2020 मध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये बिहारचा रहिवासी असलेला शुभम कुमार (UPSC Topper Shubham Kumar ) देशातून पहिला आला आहे. आयआयटी मुंबईमधून त्याने (सिविल इंजिनीयरिंग) बीटेकमध्ये पदवी घेतलेल्या शुभमने तिसऱ्या प्रयत्नात अव्वल क्रमांक मिळवला. याआधी त्याने 2018 आणि 2019 मध्ये परीक्षा दिली होती. 2019 मध्ये तो देशात 290 वा आला होता. 24 वर्षांचा शुभम सध्या इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्व्हिसमध्ये प्रशिक्षण घेत आहे. शुभम सहावीत असताना त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्याचं आयुष्यच बदललं आहे. शुभमने आपल्या मुलाखतीतून यशाची रहस्यं उलगडली.
सहावीत शिकत असताना अशी एक घटना घडली होती की त्यामुळे त्याने कटिहार सोडून पाटणा (Patana) येथे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. शुभमने "मी सहावीत असताना एका प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं होतं मात्र एका शिक्षकांनी माझं उत्तर चूक असल्याचं सांगितलं होतं. माझं उत्तर योग्य असल्याची मला खात्री आणि विश्वास होता. शिक्षकांच्या या कृत्यामुळे मी दुःखी झालो आणि तेव्हाच मी शिक्षणासाठी पाटण्याला जायचा मोठा निर्णय घेतला. मला पाटण्याला जाऊन चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, असं मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं. त्यांनीही मला विरोध केला नाही. तेव्हाच माझ्या आयुष्याला वळण मिळालं. माझं पुढचं शिक्षण पाटणा आणि बाकीच्या शहरांत झालं. त्याचीच परिणाम म्हणून मला आज हे यश मिळालं आहे" असं म्हटलं आहे.
UPSC Result : शुभम भारावला... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट अमेरिकेतून 'पुण्यात कॉल' https://t.co/NMyLfuv9eh
— Lokmat (@MiLOKMAT) September 25, 2021
शुभम भारावला... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट अमेरिकेतून 'पुण्यात कॉल'
परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर न्यूज 18 ने शुभमशी संवाद साधला. त्यावेळी त्याने आयुष्यातील अनेक गोष्टींची माहिती दिली आहे. "यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी मी दिल्लीला आलो पण कोणत्या तरी विशिष्ट शहरात जाऊन किंवा एखाद्या विशिष्ट कोचिंग क्लासमध्ये गेलं, तरच परीक्षेची तयारी होऊ शकते असं काही नाही. या परीक्षेची तयारी कोणीही विद्यार्थी कुठेही करू शकतो. फक्त त्या विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची तयारी असली पाहिजे. आता तर डिजिटल माध्यमांचा जमाना आहे. ऑनलाईन वेबसाईट्स किंवा यू-ट्यूबवर एकापेक्षा एक स्टडी मटेरियल उपलब्ध आहे. त्याच्या मदतीने विद्यार्थी तयारी करू शकतात. कोणाला असं वाटत असेल, की ते बिहारमध्ये तयारी करू शकत नाहीत, तर तसं अजिबात नाही हे लक्षात घ्यावं. विद्यार्थी कोणतंही शहर किंवा गावात राहूनही परीक्षेची तयारी करू शकतात. तसंच गेल्या काही वर्षांत या परीक्षेत बिहारच्या विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली होत आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेत यश मिळवत आहेत" असं शुभमने सांगितलं.
"ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवण्यावरही भर देणार"
आपण परीक्षेची तयारी कशी केली, याबद्दलही शुभमने माहिती दिली. तो दर दिवशी सात ते आठ तास अभ्यास करत असत. अशा प्रकारे त्यांनी जवळपास तीन वर्षं अभ्यास केला. तेव्हा हे यश मिळालं. विद्यार्थ्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली किंवा ऑनलाइन स्टडी मटेरियल वापरलं, तरी त्यांना सर्वांत जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं ते सेल्फ स्टडीवर. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातली 70 टक्के लोकसंख्या शेतीवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहे. त्यामुळे गावांच्या विकासावर आपला भर असेल असं म्हटलं आहे. तसेच, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवण्यावरही भर देणार असल्याचं त्याने सांगितलं.'मी ग्रामीण भागातला असल्यामुळे यूपीएससीच्या इंटरव्ह्यूतही मला ग्रामीण विकासासाठी काय करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता' असं देखील शुभमने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
https://t.co/Ax4EkbH8Ge
— Lokmat (@MiLOKMAT) September 24, 2021
यूपीएससी मध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले, यात बिहारचा शुभम कुमार देशातून पहिला आला आहे.#UPSC