"अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक, काही देश दहशतवादाची मदत करतायत"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:43 PM2021-08-19T22:43:36+5:302021-08-19T22:48:38+5:30
Afghanistan Taliban Crisis : नाव न घेता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा. UNSC च्या बैठकीत अफगाण संकटावर परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) बोलताना अफगाण संकटावर मोठं वक्तव्य केलं. काही देश दहशतवादाची मदत करत आहेत, त्यांना थांबवणं आवश्यक आहे, असं पाकिस्तानचं नाव न घेता जयशंकर म्हणाले. "दहशतवादाची प्रत्येक रूपात निंदा केली गेली पाहिजे. दहशतवादाचा कोणीही गौरव करू नये. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगानं एकत्र येणं आवश्यक आहे. दहशतवादाच्या लढाईत भारत पूर्णपणे पुढेही सहकार्य करण्यास तयार आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.
सध्या भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अध्यक्षस्थानी आहे. गुरूवारी या सुरक्षा परिषदेत दहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी निर्माण होत असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. "दहशतवादाला कोणताही धर्म, राष्ट्र, संस्कृती किंवा जातीय समुहाशी जोडून पाहिलं जाऊ शकत नाही. दहशतवादाचा कायम निषेध केला गेला पाहिजे," असं जयशंकर म्हणाले.
#WATCH | "...Whether it's in Afghanistan or against India, LeT & JeM continue to operate with both impunity & encouragement.. This Council must not take a selective view of the problems we face..." EAM S Jaishankar ta UNSC briefing pic.twitter.com/n56EhB3lQu
— ANI (@ANI) August 19, 2021
जयशंकर यांनी यावेळी कोरोनाचं उदाहरण देत म्हटलं, की जे कोरोनासाठी सत्य आहे, तेच दहशतवादासाठी सत्य आहे. जोपर्यंत सर्व सुरक्षित होणार नाहीत, तोवर कोणीही सुरक्षित राहणार नाही. अफगाणिस्तान असेल किंवा भारत, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद सारख्या दहशवादी संघटना सतत सक्रिय असल्याचंही ते म्हणाले.
दहशतवाद्यांना बिटकॉईनच्या माध्यमातून बक्षीस
एस. जयशंकर यांनी बोलताना ISIS चा उल्लेख केला. "दहशवतादी संघटना ISIS चा पाया मजबूत होत आहे. दहशतवाद्यांना जीव घेण्याच्या मोबदल्यात बिटकॉईन्स बक्षीस म्हणून दिल्या जात आहेत. तरूणांना ऑनलाइन पद्धतीनं अपप्रचार करून भटकवण्याचं काम केलं जात आहे," असंही ते म्हणाले. "जेव्हा आम्ही पाहतो की कोणाचे हात एखाद्याच्या रक्तानं रंगलेले असतील आणि त्यांचं कोणता देश स्वागत करतो, सुविधा पुरवतोय, तेव्हा आम्ही बोलण्याचं धाडस नक्कीच करतो. भारतानं भरपूर दहशतवाद सहन केला आहे. २००८ मध्ये मुंबई हल्ला, २०१६ पठाणकोट एअरबेस हल्ला. २०१९ मध्ये पुलवामा, परंतु आम्ही दहशतवादासोबत कधीच तडजोड केली नाही," असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं.