रक्षाबंधनानिमित्त बहिणीची भावाला अनोखी भेट; मूत्रपिंड दान करून भावाला दिले नवे आयुष्य
By नितीन जगताप | Published: August 21, 2021 11:12 PM2021-08-21T23:12:13+5:302021-08-21T23:12:56+5:30
मूत्रपिंड दान करून बहिणीनं भावाला दिलं नवं आयुष्य.
नितीन जगताप
रक्षाबंधन म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहिण भावाचं नातं शब्दांत मांडता येऊ शकत नाही. उल्हासनगरमध्ये एका बहिणीनं आपल्या भावाला जीवनदान देत रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली आहे. आपल्या भावाला मूत्रपिंड दान करून बहिणीनं त्याला नवं आयुष्य दिलं आहे.
उल्हासनगर येथील अजय जैस्वानी इम्युनोलॉजिकल आजाराने पीडित होते, त्यासोबत त्याला ग्लोमेरूलोनेफ्रिटिस आजार झाल्याने त्याचे मूत्रपिंड निकामी झाले होते. अशा केसेस विशेषत: या वयोगटातील व्यक्तींमध्ये अंतिम टप्प्यामधील रेनल फेल्युअरच्या १२ टक्क्यांहून कमी प्रमाणात आढळून येतात. रूग्णाचे आरोग्य खालावत जात होते आणि दीर्घकाळापर्यंत वाट पाहिल्यास त्याच्या जीवाला धोका होता, त्यामुळे प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. अजय यांची बहिण सपना यांनी त्यांचे जीवन वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. रूग्णाशी बहीणीचे मूत्रपिंड परिपूर्णपणे जुळत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील कन्सल्टिंग नेफ्रोलॉजिस्ट व ट्रान्सप्लाण्ट फिजिशियन डॉ. हरेश दोदेजा व त्यांच्या टीमने यशस्वीरित्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.
दीर्घकाळापासून अजयच्या मूत्रावाटे प्रथिने उत्सर्जित होते होती आणि २०१८ मध्ये त्याच्या डोळ्यांमध्ये सूज आली. ईएनटी स्पेशालिस्ट्ससोबत अनेक समुपदेशन केल्यानंतर त्याला कन्सल्टेशन व पुढील तपासणीसाठी डॉ. हरेश दोदेजा यांच्याकडे नेण्यात आले. तेथे त्यांच्या स्थितीचे निदान झाले. तेव्हापासून अजय हे डॉ. दोदेजा यांच्याकडे उपचार घेत होते आणि पुढील तीन वर्षांमध्ये त्याची स्थिती बऱ्यापैकी सुधारली होती. पण हळूहळू त्याच्या मूत्रपिंडाचे कार्य खालावत गेले आणि त्यांना डायलिसिसचा उपचार घेण्याची किंवा प्रत्यारोपण करण्याची गरज भासली. काही सत्रे डायलिसिस उपचार घेतल्यानंतर रूग्णाने मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचे ठरवले. अधिक विचार न करता त्याच्या बहिणीने स्वइच्छेने तिचे मूत्रपिंड दान करण्याचे ठरवले आणि ते मूत्रपिंड परिपूर्णरित्या जुळली. नुकतीच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. एका आठवड्यामध्ये ती बरी होऊन तिच्या नित्यक्रमावर परतली. रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून कामावर परतला आहे आणि घरातून काम करायला सुरूवात केली आहे.
कठीण काळादरम्यान माझ्या बहिणीने मला मोठा पाठिंबा दिला आहे. ती माझा आधारस्तंभ आहे आणि तिचा निर्धार व आत्मविश्वास पाहिल्यानंतर मला खात्री झाली की, मी या आव्हानावर मात करू शकतो. डॉक्टरांनी देखील आम्हाला खूप आधार दिला आणि दान व प्रत्यारोपण प्रक्रियेदरम्यान आमच्याशी समुपदेशन केले. मी माझे जीवन वाचवणारे फोर्टिस हॉस्पिटल येथील तज्ञांच्या टीमचे आभार मानतो.
अजय जैस्वानी, रुग्ण
तरूणांमध्ये किडनी फेल्युअर आजार होणे अकल्पनिय आहे. कारण डायलिसिस किंवा प्रत्यारोपण करावे लागणारे लोक हे मधुमेह व उच्च रक्तदाबाने, तसेच वृद्ध काळातील आजारांनी पीडित असतात. या रुग्णाची स्थिती खालावत जात होती, ज्यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय उरला होता. मी भावंडांच्या या धैर्याला सलाम करतो. त्यांच्या या पुढाकारामधूनच आम्हाला अशा अवघड प्रसंगी प्रेरणा मिळते, कारण गंभीर रूग्णांसाठी योग्य दाता मिळणे हे अत्यंत कष्टप्रद असते. महासाथीच्या प्रादुर्भावापासून अवयव दान करण्यामध्ये घट झाली आहे. लोकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यायला हवा.
डॉ. हरेश दोदेजा, कन्सल्टिंग नेफ्रोलाजिस्ट व ट्रान्सप्लाण्ट फिजिशियन ,फोर्टिस हॉस्पिटल