भारीच! लेकीच्या आजारपणामुळे नोकरी गेली पण 'तिने' हार नाही मानली; अशी कोट्यवधींची कमाई केली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:04 PM2021-09-30T19:04:46+5:302021-09-30T19:07:35+5:30
Woman quit job for sick daughter now earning 14 crores : मुलीच्या आजारपणामुळे एका महिलेने आपली नोकरी गमावली. पण नंतर परिस्थितीसमोर हार न मानता, खचून न जाता आपल्या कष्टाने आता कोट्यवधींची कमाई केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. मुलीच्या आजारपणामुळे एका महिलेने आपली नोकरी गमावली. पण नंतर परिस्थितीसमोर हार न मानता, खचून न जाता आपल्या कष्टाने आता कोट्यवधींची कमाई केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. महिलेला आपल्या आजारी मुलीसाठी नोकरी सोडावी लागली. पण नोकरी नसल्याने तिची घरची परिस्थिती अत्यंत बेताची झाली. आर्थिक संकट उभ राहिलं. तेव्हा महिलेने मित्रांच्या सल्ल्याने एक छोटा ऑनलाईन बिझनेस सुरू केला.
महिलेला सुरुवातीला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. पण आता ती कोट्यवधींची कमाई करत आहे. मिरर यूकेने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या Northampton मधील 33 वर्षीय ओमोटायो अदेबिसी (Omotayo Adebisi) या एका कंपनीत काम करत होत्या. मात्र याच दरम्यान त्यांची एक वर्षाची मुलगी आजारी पडली. उपचारासाठी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अदेबिसी यांनी मुलीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्या कंपनीत काम करत होत्या तेथील बॉसकडे सुट्टी मागितली. पण त्याने सुट्टी देण्यास नकार दिला. त्यामुळेच ओमोटायो अदेबिसी यांनी राजीनामा दिला आणि नोकरी सोडली.
Tilzmart नावाचं एक ऑनलाईन शॉपिंग पोर्टल केलं सुरू
नोकरी नसल्याने ओमोटायो अदेबिसी यांना आर्थिक चणचण भासू लागली. घरची परिस्थिती थोडी बिकट झाली. कुटुंबाचं पोट भरणं अवघड झालं. त्याचवेळी अदेबिसी यांना त्यांच्या काही जवळच्या मित्रांनी स्वत:चा ऑनलाईन बिझनेस सुरू करण्याचा सल्ला दिला. आणि यामुळेच पुढे अदेबिसी यांचं संपूर्ण आयुष्यचं बदललं. Tilzmart नावाचं एक ऑनलाईन शॉपिंग पोर्टल सुरू केलं. ज्यामध्ये खेळणी, गिफ्ट्स, फूड हॅम्पर्स आणि फिटनेससह इतरही काही गोष्टींचा समावेश होता. साठवलेले चार लाख रुपये गुंतवून त्यांनी या बिझनेसला सुरुवात केली. त्या वस्तुंची ऑनलाईन विक्री करत होत्या.
वार्षिक कमाई ही जवळपास 14 कोटींहून अधिक
अदेबिसी यांना यामध्ये त्यांच्या पतीने देखील खूप मदत केली. सामानाचं पॅकिंग, लेबलिंगचं काम केलं. बिझनेसमध्ये त्यांना काही वेळा नुकसान देखील सहन करावं लागलं. अदेबिसी या चुकांमधून खूप काही शिकल्या. काही काळ त्यांनी यातून थोडा ब्रेक घेतला आणि त्यानंतर स्वत:ची Tilzmart.com ही वेबसाईट लॉन्च केली. सध्या हे एक लोकप्रिय शॉपिंग पोर्टल आहे. यांची वार्षिक कमाई ही जवळपास 14 कोटींहून अधिक आहे. Tilzmart मध्ये सध्या 25 पार्टटाईम आणि सात फुलटाईम कर्मचारी आहेत. ओमोटायो अदेबिसी यांना आपला बिझनेस आणखी मोठा करायचा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.