नवी खेळी : तालिबान सरकारसाठी चीनकडून 310 लाख डॉलर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 06:11 AM2021-09-10T06:11:19+5:302021-09-10T06:11:26+5:30
नवी खेळी : बहुतांश देशांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका
बीजिंग : अमेरिकेने सैन्य मागे घेताच काही दिवसांत तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. तालिबान सरकारला पाठिंबा देण्याबाबत बहुतांश देश आता तरी थांबा आणि वाट पाहा स्थितीत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चीनने तालिबान सरकारसाठी तब्बल ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानमधील अराजकता संपवून योग्य शासन व्यवस्था देण्यासाठी तालिबानला मदतीची गरज आहे म्हणून तालिबान सरकारला ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या आर्थिक मदतीची घोषणा चीनने केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सरकार स्थापन केले आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद पंतप्रधान, तर अब्दुल गनी बरादर उपपंतप्रधान असतील. सिराज हक्कानीला गृहमंत्री, तर मुल्ला याकूबला संरक्षण मंत्री बनविण्यात आले आहे. खैरउल्लाह खैरख्वा हे माहिती प्रसारण मंत्री, तर अब्दुल हकीम याच्याकडे कायदे मंत्रालय असेल. शेर अब्बास स्टानिकजई परराष्ट्र राज्य मंत्री असतील. जबिउल्लाह मुजाहिदला माहिती प्रसारण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. गैर तालिबानींना अफगाणिस्तानच्या नव्या सरकारमध्ये सामावून घेण्याची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. परंतु, ती पूर्ण झाली नाही.
३० लाख लसी दान
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटले की, चीन आर्थिक मदतीसह तालिबान सरकारला अन्नधान्य, औषधे, लसी, कपडे यांचीही मोठ्या प्रमाणावर मदत करणार आहे. पहिल्या टप्प्यात चीन अफगाणिस्तानला ३० लाख लसी दान म्हणून देणार असल्याचे समजते.