Video: सीरियात महागाईचा भस्मासुर! एक कप कॉफी खरेदीसाठी द्यावा लागतो नोटांचा बंडल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 13:17 IST2024-12-22T13:17:05+5:302024-12-22T13:17:27+5:30
इथल्या रेस्टॉरंटमध्ये मेन्यूची किंमत लिहिलेली नसते कारण कुठल्याही वस्तूची किंमत स्थिर नाही.

Video: सीरियात महागाईचा भस्मासुर! एक कप कॉफी खरेदीसाठी द्यावा लागतो नोटांचा बंडल
सीरिया, जो कधीकाळी सभ्यता आणि इतिहासाचं प्रतिक मानलं जायचं आज तिथं गंभीर आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. अलीकडेच राष्ट्रपती असद यांनी देशातून पलायन केल्यानंतर तिथे अस्थिरता निर्माण झाली आहे. गृहयुद्ध, आंतरराष्ट्रीय निर्बध, जागतिक परिणाम यामुळे देशातील लोक महागाईच्या जाळ्यात अडकले आहेत. सीरियातील सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक दिवस जगणं कठीण झालं आहे. याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
एक ट्रॅव्ल्हर ब्लॉगर इलोना करफिन हिने अलीकडेच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सीरियातील परिस्थितीची जाणीव जगाला करून दिली आहे. याठिकाणी इतकी भीषण दुरावस्था झाली आहे की, लोकांना पाकिट ठेवणे तर दूर कुठलेही सामान खरेदी करण्यासाठी नोटांचे बंडल द्यावे लागत आहे. इथल्या रेस्टॉरंटमध्ये मेन्यूची किंमत लिहिलेली नसते कारण कुठल्याही वस्तूची किंमत स्थिर नाही. परदेशी ब्रँन्डनेही सीरियातील त्यांची उत्पादने बंद केलीत. लोकांना स्थानिक उत्पादनावरच निर्भर राहावे लागत आहे.
चलन संकटात, अडचणी वाढल्या
सीरियात राजकीय अन् आर्थिक संकटात असलेले चलन, सीरियन पाऊंडचे दर घसरले आहेत. कधीकाळी १ अमेरिकन डॉलर हा ५० सीरियन पाऊंडच्या बरोबर होता. परंतु आज हाच दर १५ हजार सीरियन पाऊंड प्रति डॉलर पोहचला आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की एक कप कॉफीची किंमत २५ हजार सीरियन पाऊंड झाली आहे.
सोशल मीडियात व्हायरल झालेला हा व्हिडिओ १० मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने या देशातील विदारक स्थिती पाहून हळहळ व्यक्त केली आहे. तर दुसऱ्याने या परिस्थितीत जगण्याची कल्पनाही करवत नाही असं म्हटलं आहे. अनेकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरून येणारी मदत कमी पडतेय अशी खंत बोलून दाखवली. जगाने सीरियाला आर्थिक मदत करायला हवी अशी मागणी होत आहे. काहींनी सीरियातील नागरिकांचं अशा संघर्षातही जीवन जगतायेत हे पाहून कौतुक केले आहे.