प्रत्येक 8 मुलींपैकी एकीवर होतात लैंगिक अत्याचार; ‘युनिसेफ’च्या अहवालातील भयंकर वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 06:51 AM2024-10-13T06:51:09+5:302024-10-13T06:51:40+5:30
ऑनलाइन छळ तसेच अन्य अत्याचारांची गणना केल्यास पीडित मुलींची संख्या ६५ कोटींच्या घरात जाईल, असे यात म्हटले आहे. यामुळे जगभरात बाल अधिकारांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणास सुरु आहे, हे समोर आले आहे. (वृत्तसंस्था)
जिनिव्हा : जगातील तब्बल ३७ कोटी अल्पवयीन मुलींना वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधी एकदातरी बलात्कार, लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे, असे भयंकर वास्तव ‘युनिसेफ’ने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर दर आठ मुलींमागे एका मुलीला या भयंकर अनुभवाचा सामना करावा लागला आहे.
ऑनलाइन छळ तसेच अन्य अत्याचारांची गणना केल्यास पीडित मुलींची संख्या ६५ कोटींच्या घरात जाईल, असे यात म्हटले आहे. यामुळे जगभरात बाल अधिकारांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणास सुरु आहे, हे समोर आले आहे. (वृत्तसंस्था)
अत्याचार मुलांवरही :
अल्पवयीन मुलीच नव्हे तर मुलेही लैंगिक अत्याचाराचे बळी ठरले आहेत. जगभरात तब्बल २४ कोटी मुलांनी बालवयात या अत्याचारा भयंकर अनुभव घेतला आहे. ऑनलाइन छळ, बॅड टच आदी गैरप्रकारांचा गणना केल्यास जगभरातील पीडित मुलांची संख्या ५३ कोटीपर्यंत आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
अत्याचाराचे घाव राहतात आयुष्यभर
दीर्घकाळ लैंगिक अत्याचारामुळे पीडित व्यक्ती मानसिक दृष्टीने पूर्णपणे खचून जाते. अनेक प्रकारचे आजार जडू शकतात.
यामुळे त्यांना चिंता, ताण आणि अनेक मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. यातून बाहेर पडण्यासाठी पीडित ड्रग्जचा आसरा घेतात.
पीडित व्यक्तीला सामान्यपणे जीवन जगणे कठीण होऊन बसते. झालेल्या अत्याचाराबाबत पीडित व्यक्तीने कुठेही वाच्यता न केल्यास मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होण्याची भीती असते.
कोणत्या वयात होतात सर्वाधिक अत्याचार?
- लैंगिक अत्याचाराची सुरुवात किशोरावस्थेतच होते. १४ ते १७ या वयाच्या टप्प्यात लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता अधिक असते.
- यामुळे पीडित मुलींचे शारिरीक तसेच मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.
- राजकीय संघर्षातून अस्थिरतेने ग्रस्त प्रदेशात तसेच तात्पुरत्या उभारलेल्या शरणार्थी शिबिरांमध्ये असे अत्याचार होण्याची शक्यता अधिक असते.
- शरणार्थी शिबिरांमधील दर चार मुलींमागे एक मुलगी लैंगिक अत्याचाराची बळी ठरलेली आहे, असे हा अहवाल सांगतो.