जगभरात झालेल्या टेहळणीत २ भारतीय पत्रकार; इस्रायलच्या कंपनीवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 04:07 AM2019-11-01T04:07:26+5:302019-11-01T04:07:41+5:30
एनएसओ ग्रुप’वर व्हॉटस्अॅप खटला भरणार
नवी दिल्ली : इस्रायलचे पेगॅसस या नावाचे स्पायवेअर वापरून अज्ञात लोकांनी जगभर ज्या लोकांवर लक्ष ठेवले वा त्यांच्या खासगी व्यवहारांत नाक खुपसले त्यात भारतीय पत्रकार आणि मानवी हक्क कार्यकर्तेही आहेत, असे फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉटस्अॅपने गुरुवारी म्हटले.
इस्रायलची टेहळणी करणारी ‘एनएसओ ग्रुप’ या कंपनीवर आम्ही खटला दाखल करीत आहोत, असे व्हॉटस्अॅपने म्हटले. सुमारे १,४०० जणांचे फोन्स हॅक करून त्यांची हेरगिरी करण्यास अज्ञात व्यक्तींना ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मदत झाली, ती हीच कंपनी असल्याचे वृत्त आहे. हे फोन वापरकर्ते (युझर्स) चार खंडांतील असून, त्यात राजकीय मुत्सद्दी, राजकीय बंडखोर, पत्रकार आणि कार्यकर्ते आहेत. पत्रकार आणि कार्यकर्त्यांचे फोन्स कोणाच्या आदेशांवरून हॅक केले गेले, हे व्हॉटस्अॅपने सांगितले नाही व एनएसओ ग्रुपने स्पष्ट केले की, पेगॅसस सॉफ्टवेअर जगभर फक्त सरकारी संस्थांनाच विकले जाते. लोकसभा निवडणुकीच्या किंचित आधी २० पेक्षा जास्त भारतीयांना त्यांच्या फोन्सची दोन आठवडे टेहळणी केली जात असल्याचे सावध केले गेले होते. या टेहळणीत प्रशासनाचा काही हात असल्याचा इन्कार सूत्रांनी केला आहे.
भारतात किमान दहा कार्यकर्त्यांनी व्हॉटस््अॅपवर आम्हाला टेहळणी करणाऱ्या सॉफ्टवेअरने लक्ष्य केले गेले, याला दुजोरा दिला आहे. असे लक्ष्य केले गेलेल्यांत भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणात अटक झालेले मानवी हक्क कार्यकर्ते दोन वकील, हफिंगटन पोस्ट आणि स्क्रोलचा समावेश आहे. इतरांत ज्यांचे फोन्स स्पायवेअरने हॅक केले गेले त्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील दलित हक्क कार्यकर्त्यांचा समावेश आहे.