मलालाच्या १० हल्लेखोरांना अटक
By admin | Published: September 13, 2014 12:01 AM2014-09-13T00:01:53+5:302014-09-13T00:01:53+5:30
मलालाच्या १० हल्लेखोरांना अटक
Next
म ालाच्या १० हल्लेखोरांना अटकइस्लामाबाद : २०१२ मध्ये पाकिस्तानी किशोरवयीन कार्यकर्ती मलाला युसूफझाईला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या तालिबानच्या दहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पाकच्या लष्कराने शुक्रवारी ही घोषणा केली. मुलींच्या शिक्षणावरील रोकठोक विचारांमुळे तालिबानने तिला लक्ष्य केले होते. वायव्य पाकिस्तानातील स्वात खोर्यात तहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या बंदूकधार्यांनी मलालाच्या (तेव्हा वय १५ वर्षे) डोक्यात गोळी घातली होती. मलाला या हल्ल्यातून बचावली. मलालाने मुलींच्या शिक्षणासाठी दाखविलेल्या साहसाबद्दल तिला जागतिक कीर्ती प्राप्त झाली. या हल्ल्यात तिच्या दोन वर्गमैत्रिणीही जखमी झाल्या होत्या. तालिबानचा कमांडर मुल्ला फझलुल्हा हा या हल्ल्याचा सूत्रधार होता अशी माहिती अटकेतील दहशतवाद्यांनी दिली आहे, असे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनचे महासंचालक असीम सलीम बज्वा यांनी सांगितले. गुप्तचरांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली व यात पोलिसांनीही सहभाग घेतली होता, असे बज्वा यांनी म्हटल्याचे वृत्त द एक्सप्रेस ट्रीब्यूनने दिले आहे. दहशतवाद्यांच्या या गटाला स्वात खोर्यातील मलाकंद येथे जेरबंद करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराच्या उत्तर वजिरिस्तानात तालिबान आणि इतर दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या मलाला उपचारांसाठी ब्रिटनला हलविण्यात आले होते. ती आता बर्मिंगहॅम येथे वास्तव्याला आहे. मलाला नोबेल पुरस्काराच्या शर्यतीतही होती. (वृत्तसंस्था)