ब्रिटनच्या संसदेत १० भारतीय विजयी
By admin | Published: May 9, 2015 12:16 AM2015-05-09T00:16:37+5:302015-05-09T00:16:37+5:30
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह अर्थात हुजूर पक्षाला ब्रिटनच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून, निकाल त्रिशंकू लागतील
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह अर्थात हुजूर पक्षाला ब्रिटनच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून, निकाल त्रिशंकू लागतील या निवडणूकपूर्व संकेतांना स्पष्ट झुगारत सर्वांत मोठा पक्ष म्हणून हुजूर पक्षाने विजय मिळविला आहे. याचबरोबर निवडणूक निकालांनी आघाडीचे राजकारण संपुष्टात आणले आहे. कॅमेरुन यांना ३३१ जागा मिळाल्या असून ६५० जागांच्या हाऊस आॅफ कॉमन्समध्ये त्यांनी निम्म्या जागांचा आकडा थोडक्यात ओलांडला आहे. दरम्यान, या निवडणुकीत भारतीय वंशाचे तब्बल १० उमेदवार निवडून आले.
हुजूर पक्षाचे करिश्माई नेता डेव्हिड कॅमेरुन (४८) यांनी आपला पक्ष पुन्हा सत्तेवर आणला असून, त्यांना ३३१ पेक्षा आणखी चार जागा मिळतील, असे संकेत आहेत. हा विजय सर्वांत मधुर आहे, असे कॅमेरुन यांनी विजय साजरा करणाऱ्या समर्थकांना सांगितले. विजयानंतर पक्ष कार्यालयात ते बोलत होते.
विजयाचे संकेत दिसू लागल्यानंतर कॅमेरुन यांनी पत्नीसह राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली. आम्ही देशासाठी काहीतरी खास घडवून आणण्याच्या काठावर आहोत, असे त्यांनी राणीला सांगितले.
मतदानपूर्व अंदाज चुकले
निवडणूकपूर्व मतदान चाचणीत हुजूर व मजूर या दोन्ही पक्षांना ही निवडणूक अटीतटीची जाईल असे म्हटले होते व सत्तेवर येणाऱ्या पक्षाला एकापेक्षा जास्त पक्षांचा पाठिंबा घ्यवा लागेल, असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)