सौदी अरेबियातील अग्नितांडवात 10 भारतीयांचा होरपळून मृत्यू
By admin | Published: July 13, 2017 12:48 PM2017-07-13T12:48:45+5:302017-07-13T12:54:16+5:30
सौदी अरेबियामध्ये बुधवारी (12 जुलै ) रात्री एका घराला लागलेल्या आगीत 10 भारतीयांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 13 - सौदी अरेबियामध्ये बुधवारी (12 जुलै ) रात्री एका घराला लागलेल्या भीषण आगीत 10 भारतीयांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर अन्य 6 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. दुर्घटनेनंतर जेद्दाह येथील भारतीय दुतावासाचे अधिकारी नजरान येथे रवाना झाले आहेत. या अग्नितांडवात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे मात्र त्याची ओळख पटवण्यात आलेली नाही.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे सांगितले की, माझा जेद्दाह येथील कॉन्सल जनरलसोबत संपर्क झाला आहे. नजरान येथे घडलेल्या या अग्नितांडवात 10 भारतीय नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विद्या एस. नावाच्या एका महिलेच्या पतीचा या अग्नितांडवात मृत्यू झाला. आपल्या पतीचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी विद्यानं परराष्ट्र मंत्रालयाकडे ट्विटद्वारे मदतीची मागणी केली. या ट्विटला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दुर्घटनेबाबतची माहिती दिली.
पुढे त्यांनी असेही सांगितले की, नजरान जेद्दाहपासून 900 किलोमीटर अंतरावर आहे. आपल्या कॉन्सल जनरल नजरान येथील गव्हर्नरच्या संपर्कात आहेत आणि तेथील प्रत्येक घडामोडीबाबत मला माहिती देत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेले सर्व जण एका कन्स्ट्रक्शन कंपनीतील कर्मचारी होते. दरम्यान, अग्नितांडवाची ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
I am aware of the fire tragedy in Najran in which we have lost 10 Indian nationals and six injured are in the hospital. /1 https://t.co/feOTqPnn2E
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 12, 2017
I have spoken to Consul General Jeddah. Najran is 900 Kms from Jeddah. Our staff is rushing by the first flight available. /2
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 12, 2017
Our Consul General is in touch with the Governor of Najran. He is updating me on regular basis. /3
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 12, 2017