"10 लाख मृत्यू, 10 कोटी रुग्ण..."; चीनमध्ये आणखी हाहाकार माजवणार Corona, तज्ज्ञांचा इशारा धडकी भरवणारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 06:58 PM2022-12-25T18:58:12+5:302022-12-25T18:59:09+5:30
Corona In China : चीनमध्ये सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञांनी धडकी भरवणारे आकडे समोर ठेवले आहेत.
चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या या वाढत्या रुग्णसंखेने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. केवळ चीन नाही, तर जपान, अर्जेंटिना, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्येही रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे.
चीनमध्ये सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञांनी धडकी भरवणारे आकडे समोर ठेवले आहेत. आरोग्य अधिकार्यांचे म्हणणे आहे की चीनमध्ये आगामी काळात एका आठवड्यात 3.7 कोटी लोकांना करोनाची लागण होऊ शकते. याच बरोबर, कोट्यवधी लोक कोरोना पॉझिटिव्ह होण्याची आणि लाखो लोकांचा मृत्यू होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
काय म्हणतायत तज्ज्ञ?
माध्यामांतील वृत्तांनुसार, चीनमध्ये सातत्याने होत असलेल्या रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर, चीनमध्ये सुमारे 10 कोटी कोरोना रुग्ण आढळण्याची आणि 10 लाख जण मृत्यूमुखी पडण्याची शक्यता असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील पल्मोनरी मेडिसिनचे एचओडी डॉ. नीरज कुमार गुप्ता (Dr. Neeraj Kumar Gupta) यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, "आम्ही गणितीय गणनेनुसार, चीनमध्ये 10 कोटींच्या जवळपास रुग्ण, 50 लाख लोक रुग्णालयात भरती आणि 10 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवत आहोत. जो एक मोठा आकडा आहे. सध्या चीन त्याच स्थितीत आहे, जसा भारत यापूर्वी होता. मात्र, आता व्हायरसचा सामना करण्यास भारत मजबूत स्थितीत आहे. चीनमधील लोकांची इम्युनिटी तेथील कडक लॉकडाऊनच्या धोरणामुळे फार कमी आहे."
एवढेच नाही, तर डॉ. गुप्ता म्हणाले, "आपण पहिल्या लाटेचा सामना केला. नंतर, डेल्टा व्हेरिअंटचा सामना केला, जो अत्यंत घातक होता. यानंतर, ओमिक्रॉन व्हेरिअंटचाही सामना केला. तो फारसा गंभीर नव्हता, पण फार वेगाने पसरत होता."