१० महिन्याच्या बाळाचं वजन तब्बल २८ किलो. काय असेल कारण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 05:06 PM2017-11-16T17:06:20+5:302017-11-16T17:22:59+5:30
बाळाचं गुबगुबीत असणं तसं उत्तम आरोग्याचं लक्षण मानलं जातं. पण हे अवाढव्य वजन चिंतेचा विषय आहे.
मेक्सिको - सामान्यत: १० महिन्यांच्या बाळाचं वजन किती असतं? फार फार तर ५ किलो. पण तुम्हाला कोणी सांगितलं की एका १० महिन्याच्या बाळाचं वजन तब्बल २८ किलो आहे तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल ना. पण हो हे खरंय. मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या एका १० महिन्याच्या चिमुकल्याचं वजन २८ किलो आहे. या चिमुकल्याला नेमका कोणता आजारा झालाय याबाबत डॉक्टर अभ्यास करत आहेत, मात्र त्याच्यावर वेळीच उपचार नाही केले तर त्याची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
सर्व फोटो - www.news.com.au
मेक्सिकोमधल्या टेकोमॅन या शहरात राहणारा लुईस मॅन्यूल्स हा चिमुकला अशा विचित्र आजाराने ग्रस्त आहे. त्याचा जन्म झाला तेव्हा तो ३.५ किलो वजनाचा होता. दुसऱ्याच महिन्यात तो १० किलोचा झाला.
सुरुवातीला आपण योग्यप्रकारे बाळाची काळजी घेतोय, स्तनपान करतोय म्हणून बाळाची सुयोग्य वाढ होतेय, असं त्याची आई इस्बेल पँटोजा हिला वाटलं. मात्र पुढच्या ८ महिन्यात त्याचं वजन तब्बल १८ किलोंनी वाढून २८ किलो झाल्याने त्यांची चिंता बळावली. त्यांनी यावर उपचार सुरू केले आहेत.
या चिमुकल्याचं वजन गरजेपेक्षा जास्त असल्याने तो व्यवस्थित हालचालही करू शकत नाही. मात्र नक्की कोणत्या कारणाने बाळाचं वजन वाढतंय यावर डॉक्टरांना उत्तर मिळू शकलेलं नाही. त्याच्यावर योग्य उपचार करण्याची गरज असून तो इतर सदृढ बाळाप्रमाणे होण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागणार आहे.
या चिमुकल्याचे आई-वडिल फार तुटपूंज्या पगारात घर चालवत असल्याने या चिमुकल्याच्या खर्चासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाहीए. यावर तोडगा म्हणून त्यांनी एक फेसबुक पेज तयार केलं असून त्याद्वारे त्यांनी मदतीची हाक दिली आहे.
गरदोरपणात चिमुकल्याच्या आईने योग्य आहार घेतला नसल्याने मुलाचं अवाढव्य वजन वाढत जात असल्याचा निष्कर्ष काही डॉक्टरांनी लावला आहे. आईने तिच्या गरदोरपणात योग्य आहार न घेतल्यास बाळाला प्रेडर विली सिंड्रोम हा आजार होऊ शकतो.
या आजारात बाळांच वजन वाढण्याची शक्यता असते. मात्र नक्की याच आजारामुळे बाळाचं वजन वाढतंय यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र आहारतज्ज्ञ सिल्विया ओरझ्को यांनी सांगितलं आहे की, वेगाने वाढणाऱ्या वजनामुळे या बाळाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे याच्यावर वेळीच उपचार होणे गरजेचं आहे.
सौजन्य - www.asianage.com