Canada Stabbings : कॅनडात 25 जणांवर चाकूने हल्ला; 10 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी, हल्लेखोर फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 08:23 AM2022-09-05T08:23:48+5:302022-09-05T08:24:40+5:30
Canada Stabbings : सस्कॅचेवान प्रांतातील जेम्स स्मिथ क्री नेशन आणि वेल्डनमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आरसीएमपीने राज्यभरातील संशयित हल्लेखोरांसाठी अलर्ट जारी केला आहे.
नवी दिल्ली : कॅनडात धक्कादायक घटना घडली आहे. कॅनडाच्या सस्कॅचेवान प्रांतात वेगवेगळ्या ठिकाणी चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर फरार आहेत. रॉयल कॅनेडियन माउंटन पोलिसांनी (आरसीएमपी) हल्लेखोरांसदर्भात अलर्ट जारी केला आहे. सस्कॅचेवान प्रांतातील जेम्स स्मिथ क्री नेशन आणि वेल्डनमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आरसीएमपीने राज्यभरातील संशयित हल्लेखोरांसाठी अलर्ट जारी केला आहे.
सस्कॅचेवानच्या ईशान्येकडील जेम्स स्मिथ क्री नेशन आणि वेल्डन व्हिलेजमध्ये ठिकठिकाणी चाकूहल्ला झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरसीएमपीच्या म्हणण्यानुसार, संशयित हल्लेखोरांची नावे डॅमियन सँडर्सन आणि माइल्स सँडर्सन अशी आहेत. त्यांच्या शोधासाठी संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्ल्यामागे संशयितांचा हेतू काय होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. आरसीएमपी सस्कॅचेवानचे सहाय्यक आयुक्त रोंडा ब्लॅकमोर यांनी सांगितले की, काही पीडितांना संशयितांनी लक्ष्य केले होते, परंतु इतरांवर अचानकपणे हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे यामागचा हेतू अद्याप कळू शकलेला नाही. जे घडले आहे, भयावह आहे.
याचबरोबर, जखमींचा आकडा वाढू शकतो, असेही ब्लॅकमोर यांनी सांगितले. ते म्हणाले, "आम्ही हल्लेखोरांना पकडण्यासाठी आमच्या सर्व साधनांसह व्यापक शोध मोहीम राबवत आहोत." तसेच, दोन्ही संशयित हल्लेखोर रेजिना येथील आर्कोला अव्हेन्यू येथून प्रवास करत असावेत. रात्री 11.20 च्या सुमारास दोन्ही संशयित रेजिना पोलिसांना दिसून आले आहेत, असे आरसीएमपीने म्हटले आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, हल्लेखोर फरार असल्याने आम्ही मॅनिटोबा आणि अल्बर्टा प्रांतातही अलर्ट जारी केला आहे. हल्लेखोर कदाचित सस्कॅचेवन नंबर प्लेट असलेल्या निसान रॉग कारमध्ये होते. तसेच, हल्लेखोर अद्याप कारमधून प्रवास करत असतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.