पंतप्रधान नरेंद्र मोदींची दहशतवादाविरोधात 10 सूत्रं
By admin | Published: July 7, 2017 09:32 PM2017-07-07T21:32:54+5:302017-07-07T21:33:19+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतल्या जी-20 शिखर परिषदेत दहशतवादाविरोधात कडक भूमिका मांडली आहे.
ऑनलाइन लोकमत
हॅमबर्ग, दि. 7 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतल्या जी-20 शिखर परिषदेत दहशतवादाविरोधात कडक भूमिका मांडली आहे. मोदींनी यावेळी दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी 10 मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी एक अॅक्शन प्लानच जगासमोर ठेवला आहे.
तसेच दहशतवादाविरोधात जगातील इतर देशांना एकत्र येण्याचं आवाहनही केलं आहे. इसिस, अल कायदा या दहशतवादी संघटनांप्रमाणेच पाकिस्तानल्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत आणि दहशतवाद पसरवत आहेत. मिडल ईस्टमध्ये अल कायदा, दक्षिण आशियात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि नायजेरियात बोको हरम यांसारख्या दहशतवादी संघटनांनी अनेक देशांत उच्छाद मांडला आहे. या संघटनांचे दहशतवादी निरपराध लोकांचे जीव घेऊन समाजात दुही माजवण्याचं काम करत आहेत.
तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सायबर स्पेस, इंटरनेट, सोशल मीडिया यांचाही हे दहशतवादी सर्रास वापर करत आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 सूत्रं जगासमोर ठेवली आहेत. मोदींच्या दहशतवादाविरोधातल्या लढ्याचं जर्मनीचे चॅन्सलर एंजेला मार्केल यांनीही तोंडभरून कौतुक केले आहे. दहशतवादाविरोधात सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं आणि त्याचा बीमोड केला पाहिजे, असंही मोदी म्हणाले आहेत.
काय आहे दहशतवादाविरोधात मोदींची 10 सूत्रे
1. दहशतवाद दिवसेंदिवस जगापुढची गंभीर समस्या होत चालली आहे, दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशाच्या अधिकाऱ्यांवर जी 20 परिषदेत बंदी घालणे.
2. संशयित दहशतवाद्यांची यादी जी 20च्या देशांना देणे गरजेचे आहे, दहशतवादी म्हणून जाहीर कठोर कारवाई झाली पाहिजे
3. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सगळ्या देशांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, प्रत्यार्पण प्रक्रिया सोपी करण्याची गरज
4. युनायडेट नेशन्सच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
5. धार्मिक दुही माजवणा-या वाढवणाऱ्यांविरोधात जी 20च्या देशांमध्ये विचारांची देवाणघेवाण होणे आवश्यत, सर्वात चांगल्या उपाययोजना अंमलात आणणे.
6. दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यासह त्यांच्या मदतीचे पर्यायही गोठवण्याची आवश्यकता आहे.
7. दहशतवाद्यांनी मिळणा-या शस्त्रास्त्रांच्या आणि स्फोटकांच्या तस्करीवर आणि खरेदी विक्रीवर बंदी घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याची गरज.
8. प्रत्येक देशानं दहशतवादी संघटनांना पाठबळ देणं बंद करणे
9. जी 20 देशांकडून सायबर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज
10. जी 20 देशांमध्ये एक दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी आणि उपाय योजण्यासह सुरक्षा सल्लागारांची नेमणूक आवश्यक.
आणखी वाचा
मुजोर चीनची पुन्हा भारताला धमकी
तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी
सिक्किमप्रश्नी कूटनीतीच्या माध्यमातूनच तोडगा, भारताची स्पष्ट भूमिका
जी 20 शिखर परिषदेत मोदींनीही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली आहे. भारत आणि चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या सिक्कीम सीमेच्या वादावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात सुरुवातीला भेट होणार नाही, अशी चर्चा होती. मात्र आज जी-20 शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चासुद्धा केली आहे. त्यामुळे मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मोदी आणि शी जिनपिंग यांनी भेट घेतल्याची अधिकृत माहिती दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, भेटीदरम्यानची माहिती अद्यापही उघड केलेली नाही.