हवाई हल्ल्यांत १० विद्यार्थी ठार
By Admin | Published: August 15, 2016 06:02 AM2016-08-15T06:02:08+5:302016-08-15T06:02:08+5:30
सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने शनिवारी उत्तर येमेनवर केलेल्या हवाई हल्ल्यांत किमान १० विद्यार्थी ठार तर २८ जण जखमी झाले
येमेन : सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने शनिवारी उत्तर येमेनवर केलेल्या हवाई हल्ल्यांत किमान १० विद्यार्थी ठार तर २८ जण जखमी झाले. ही माहिती अधिकाऱ्यांनी आणि मेडिसिन्स सॅन फ्रंटियर्सने दिली.
या महिन्याच्या सुरवातीला बंडखोरांशी झालेली शांतता बोलणी संपल्यानंतर सादा येथे हवाई हल्ले करण्यात आले. एमएसएफ या मदत गटाने सोशल नेटवर्किंग साईटवर या हल्ल्याचा निषेध केला आहे. ठार झालेली मुले ८ ते १५ वयोगटातील असून शाळेने काही मुलांची नावेही जाहीर केली आहेत. दोन वर्षांनंतर प्रथमच शनिवारी येमेनी संसदेचे अधिवेशन भरविण्यात आले होते. ही कृती अध्यक्ष अब्द-राब्बु मन्सूर हादी यांच्याविरोधातील तसेच सौदी अरेबियाचा पाठिंबा असलेल्या व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेल्या सरकारविरोधातील समजली गेली. जो संसद सदस्य या अधिवेशनाला हजर राहील त्याला गुन्हेगार समजून खटला भरला जाईल असा इशाराही हादींनी निवेदनाद्वारे दिला होता. (वृत्तसंस्था)