अमेरिकेत १०० भारतीय घुसखोरांची तुरुंगात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:23 AM2018-06-23T04:23:39+5:302018-06-23T04:23:42+5:30
अमेरिकेच्या दक्षिण भागातील सीमा ओलांडून त्या देशात बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या सुमारे १०० भारतीय नागरिकांना स्थलांतरितांसाठीच्या दोन तुरुंगांमध्ये सध्या डांबून ठेवले आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दक्षिण भागातील सीमा ओलांडून त्या देशात बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या सुमारे १०० भारतीय नागरिकांना स्थलांतरितांसाठीच्या दोन तुरुंगांमध्ये सध्या डांबून ठेवले आहे. यात बहुतांश पंजाबमधील रहिवासी असून ते शीख व ख्रिश्चनधर्मीय आहेत. त्यांच्याशी भारताच्या अमेरिकेतील दूतावासाने संपर्क साधला आहे. त्यातील ५२ भारतीय न्यू मेक्सिकोच्या तुरुंगात तर ४०-४५ नागरिक हे ओरेगन येथील तुरुंगात आहेत.
भारताच्या अमेरिकेतील दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, आमच्या एका अधिकाऱ्याने न्यू मेक्सिकोतील तुरुंगाला भेट दिली असून ओरेगन येथेही लवकरच अधिकारी जातील. न्यू मेक्सिको येथील तुरुंगात काही महिन्यांपासून १२ भारतीयांना ठेवले आहे. यातील बहुतेक लोक अमेरिकेत आश्रय मागत असून, भारतामध्ये सुरू असलेल्या हिंसाचार व अत्याचाराला कंटाळून आम्ही इथे आलो आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे.
नॉर्थ अमेरिकन पंजाबी असोसिएशनचे पदाधिकारी सतनामसिंग चहल म्हणाले की, अमेरिकेच्या तुरुंगांत भारतीय घुसखोरांपैकी बहुतांश पंजाबचे रहिवासी आहेत. २०१३ ते २०१५ या कालावधीत सीमा ओलांडून बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याबद्दल २३ हजार भारतीयांना अटक करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)