रासायनिक हल्ल्यात 100 जण मृत्युमुखी
By admin | Published: April 4, 2017 11:00 PM2017-04-04T23:00:01+5:302017-04-05T07:14:47+5:30
सीरियामधील इदबील प्रांतात मंगळवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात सुमारे १०० जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये लहान मुुलांचाही समावेश आहे.
ऑनलाइन लोकमत
दमास्कस, दि. 4 - सीरियामधील इदबिल प्रांतात मंगळवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात सुमारे 100 जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये लहान मुुलांचाही समावेश आहे. तसेच 400हून अधिक जण हल्ल्यात बाधित होऊन आजारी पडले आहेत.
सीरियन ऑब्झर्वेट्री फॉर ह्युमन राइट्सने सांगितले की, हा हल्ला सीरियातील इदलिब प्रांतातील खान शयखून येथे झाला. वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यानंतर श्वास गुदमरून लोकांचा मृत्य झाला. तर सीरियातील विरोधी पक्षांच्या उच्चस्तरीय समितीने या हल्ल्यात सुमारे 100 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. मात्र या हल्लासाठी वापरण्यात आलेली विमाने सीरियातील होती की सीरियन सरकारचे मित्र राष्ट्र असलेल्या रशियाची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, क्लोरिन गॅसचे चार थर्मोबेरिक बॉम्ब टाकण्यात आल्याचा दावा मंगळवारी एका फेसबुक पोस्टवरून करण्यात आला होता. अंतर्गत बंडाळी आणि आयएसआयएच्या कारवायांनी उद्ध्वस्त झालेल्या सीरियाच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्यासाठी युरोपियन महासंघ आणि संयुक्त राष्ट्रांनी ब्रुसेल्स येथे दोन दिवसीय संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनापूर्वीच रासायनिक हल्ल्याची ही घटना घडली आहे.
एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, मी जेव्हा पाहिलं तेव्हा लोक जमिनीवर पडून होती. मात्र त्यांच्यात चालण्याची ताकद नव्हती. अनेक लहान मुलांचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. मात्र हा हल्ला सीरियानं केला नसल्याचा दावा सीरियन सैन्यानं केला आहे. लष्कराकडून याआधीही कधी रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला नाही आणि यापुढेही कधी करणार नाही, असं सीरियाच्या लष्करानं सांगितलं आहे. हा हल्ला बंडखोरांनी केल्याचा आरोप सीरियनं सैन्यानं केला आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं या हल्ल्याचा राष्ट्रपाती बसर-अल- असद यांना जबाबदार धरलं आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी या नरसंहारावरून सीरियाच्या राष्ट्रपतींवर टीका केली आहे.