हायजॅक रेल्वेत १०० सैनिकांना मारले, सरकारने पाठविल्या २०० शवपेट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:14 IST2025-03-13T11:14:04+5:302025-03-13T11:14:15+5:30

सर्व अतिरेकी ठार झाल्याचा दावा; प्रवासी म्हणतात... हा भयंकर प्रसंग जन्मभर विसरणार नाही

100 soldiers killed in hijacked train Baloch Liberation Army claims | हायजॅक रेल्वेत १०० सैनिकांना मारले, सरकारने पाठविल्या २०० शवपेट्या

हायजॅक रेल्वेत १०० सैनिकांना मारले, सरकारने पाठविल्या २०० शवपेट्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सैनिक आणि बलूच लिबरेशन आर्मी (बीएलए) आर्मी यांच्यात ४४ तासांपासून चकमक सुरू होती.  बीएलएने मंगळवारी ४० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्यानंतर बुधवारी ६० पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

अजूनही १५० ओलिस आमच्या कैदेत असल्याचा दावा बीएलएने केला असून, पाकिस्तान सरकारने येत्या २० तासांत बलुच कैद्यांची सुटका केली नाही, तर या सर्व लोकांनाही मारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. याआधी बुधवारी दुपारी, पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानच्या क्वेटा येथे २०० शवपेटी पाठवल्या होत्या. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

या भ्याड कृत्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे आणि निष्पाप जीव गमावल्याने दुःख झाले आहे. सर्व डझनभर दहशतवाद्यांना नरकात पाठवण्यात आले आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.

हायजॅक केल्याचा व्हिडीओ

रेल्वे हायजॅक केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बीएलए नावाने हा जारी केला असला तरी बीएलएने त्याची पुष्टी केलेली नाही. या व्हिडीओत रेल्वेमध्ये स्फोट होताना दिसत आहे. इंजिनमधून मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट निघताना दिसत आहेत, 
तसेच व्हिडीओच्या पुढील भागात प्रवाशांना बंधक बनवल्याचे दिसो.

तुर्बत आहे म्हणताच सोडून दिले

प्रत्यक्षदर्शी इशाकने सांगितले की, आमच्या डब्यातील किमान ११ प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. ते सर्व सुरक्षा कर्मचारी होते. या कालावधीत एकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याला गोळ्या घालण्यात आल्या.

त्यानंतर डब्यातील सर्व लोकांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. ते मलाही घेऊन जात होते. परंतु मी सांगितले की, मी बलुचिस्तानचा रहिवासी आहे. माझ्याबरोबर महिला व मुले आहेत. त्यानंतर त्यांनी मला सोडले.

हल्लेखोरांची संख्या १,१००?

प्रवासी अशरफ याने सांगितले की, अतिरेक्यांनी वृद्ध, नागरिक, महिला व बालकांना जाऊ दिले. प्रवासी घाबरलेले होते. अंदाजानुसार ते २५० लोकांना बरोबर गेऊन गेले. हल्लेखोरांची संख्या १,१०० होती.

डोळ्यासमोरून जन्मभर ही घटना जाणार नाही

हा भयंकर प्रसंग मी जन्मभर विसरणार नाही, अशा शब्दांत पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अतिरेक्यांनी रेल्वे हायजॅक केल्याच्या घटनेतील प्रत्यक्षदर्शी प्रवासी मुश्ताक मोहम्मद यांनी आपबीती सांगितली आहे. बलूच अतिरेक्यांनी हायजॅक केलेल्या रेल्वेमधून ते प्रवास करीत होते.
 
हल्ल्याच्या सुरुवातीस भीषण स्फोट झाला. त्यानंतर गोळीबार एक तास सुरू होता. तो असा प्रसंग होता की, जन्मभर डोळ्यासमोरून जाणार नाही, असे मुश्ताक म्हणाले.

गोळीबारानंतर सशस्त्र लोक रेल्वेच्या डब्यात घुसले. काही लोकांची त्यांनी ओळखपत्रे पाहिली व काही जणांना वेगळे केले. तीन अतिरेकी आमच्या डब्याच्या दाराजवळ पहारा देत होते. आम्ही सर्वसामान्य नागरिक, महिला, वृद्ध व बलूच लोकांना काहीही करणार नाहीत. ते बलुची भाषेत बोलत होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवा, त्यांना शस्त्रे काढू देऊ नका, असे त्यांचा म्होरक्या त्यांना वारंवार म्हणत होता, असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: 100 soldiers killed in hijacked train Baloch Liberation Army claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.