आश्चर्यच! खोदकामादरम्यान सापडलं १००० वर्ष जुनं कोंबडीचं अंड; पाहून सारेच चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 04:32 PM2021-06-13T16:32:36+5:302021-06-13T16:32:57+5:30
१००० वर्षानंतरही अंड पूर्णपणे सुरक्षित; खोदकाम करणाऱ्यांसह सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का
जेरुसलेम: इस्त्रायलमध्ये संशोधनादरम्यान १ हजार वर्ष जुनं कोंबडीचं अंड आढळून आलं आहे. हे जगातलं सर्वात जुन्या अंड्यांपैकी एक असल्याचं संशोधकांनी सांगितलं. विशेष म्हणजे हे अंड सापडलं, त्यावेळी पूर्णपणे सुरक्षित होतं. मात्र त्याची सफाई करताना ते फुटलं. इस्त्रायलच्या पुरातत्व विभागानं या अंड्याबद्दलची माहिती एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
'जवळपास १००० वर्ष जुनं कोंबडीचं अंड खोदकामादरम्यान सापडलं. ते १० व्या शतकातलं असल्याचं सांगितलं जात आहे. मध्य इस्रायलमधील एका शहरात विकास प्रकल्पाचं काम सुरू असताना कोंबडीचं अंड आढळून आलं,' अशी माहिती इस्त्रायलच्या पुरातत्व विभागानं दिली आहे. 'याआधी खोदकामादरम्यान अनेकदा अंड्याची कपचे आढळून आले आहेत. मात्र संपूर्ण अंड सापडल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे,' असं इस्त्रायलच्या पुरातत्व विभागातील तज्ज्ञ डॉ. ली पेरी गाल यांनी सांगितलं.
विकास प्रकल्पासाठी खोदकाम सुरू असताना १० व्या शतकातील काही वस्तू हाती लागल्या. खोदकामादरम्यान एक इस्लामिक मलकुंड सापडलं. मलकुंडाच्या आत खोदकाम करत असताना कोंबडीचं अंड आढळून आलं. एका विशिष्ट स्थितीत असल्यानं एक हजार वर्षात हे अंड फुटलं नाही. मानवी विष्ठेत पडलेलं असल्यानं अंड सुरक्षित राहिलं, अशी माहिती इस्त्रायलमधील पुरातत्व जाणकार अल्ला नागोरस्की यांनी दिली.