१०४ वर्षांचा शास्त्रज्ञ इच्छामरण घेणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 03:22 AM2018-05-01T03:22:37+5:302018-05-01T03:22:37+5:30
डेव्हिड गूडाल हे १०४ वर्षांचे आॅस्ट्रेलियातील वयोवृद्ध वैज्ञानिक पुढील महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण घेणार आहेत. ते पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत
सिडनी : डेव्हिड गूडाल हे १०४ वर्षांचे आॅस्ट्रेलियातील वयोवृद्ध वैज्ञानिक पुढील महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण घेणार आहेत. ते पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. दोन वर्षांपूर्वी पथच्याा एडिथ कोवान विद्यापीठाने, कॅम्पसमध्ये राहण्यास अपात्र ठरवून, त्यांना सामानसुमानासह सक्तीने घराबाहेर काढले, तेव्हा जगातील वैज्ञानिक त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
आॅस्ट्रेलियात इच्छामरणास
बंदी असून, व्हिक्टोरिया राज्याने अपवादात्मक परिस्थितीत इच्छामरणाची अनुमती देणारा
कायदा केला. तो जून २०१९ मध्ये अंमलात येईल. तोे मरणासन्न अवस्थेत असलेल्या व सहा महिने जगण्याची शक्यता असलेल्यांनाच लागू होईल.
गूडाल गलितगात्र आहेत, पण ते मरणासन्न नाहीत. त्यामुळे आॅस्ट्रेलियात इच्छामरण घेणे शक्य नसल्याने त्यांनी स्वित्झर्लंडमधील बेसेल येथील दयामरण देणाऱ्या संस्थेत मृत्यूला कवटाळण्याचे ठरविले आहे.
गेल्या महिन्यात १०४ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांनी ‘एबीसी’ वृत्तवाहिनीला सांगितले की, इतकी वर्षे जगल्याचा मला पश्चात्ताप होतोय. मी बिलकूल आनंदी नाही, मला मृत्यू हवाय! नैसर्गिक मृत्यू येत नसल्याचे दु:ख नाही. पण मृत्यू येण्यासाठी काही करू शकत नसल्याने मी निराश आहे. दयामरणाचा पुरस्कार करणारी ‘एक्झिट इंटरनॅशनल’ ही संस्था त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांना मदतनीसासह दयामरणासाठी स्वित्झर्लंडला जाता यावे यासाठी संस्थेने ‘गो फंड मी’ ही आॅनलाइन निधीसंकलन मोहीम चालवून १७ हजार अमेरिकन डॉलर उभे केले आहेत.