कोरोनाचा 'दणदणीत' पराभव करत 'ठणठणीत' होऊन घरी परतल्या 'या' 107 वर्षांच्या आजी, असा साजरा केला होता वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 05:22 PM2020-04-11T17:22:29+5:302020-04-11T17:34:43+5:30
कॉर्नेलिया यांना कोरोनाची लागण नेदरलँडमध्येच एका बेटावर पर्यटनासाठी गेल्या असता झाली होती. पर्यंटकांच्या या गटात एकूण 40 जण होते. यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कॉर्नेलिया यांनी न थकता आणि न डगमगता कोरोनावर मात केली आहे.
अॅम्स्टरडॅम : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात मृत्यूचे तांडव सुरू आहे. संपूर्ण जगच कोरोनाच्या दहशतीखाली आहे. मात्र, असे असतानाच नेदरलँडच्या एक 107 वर्षांच्या आजी कोरोनाचा दणदणीत पराभव करून ठणठणीत होऊन घरी परतल्या आहेत. त्यांनी घरी गेल्यानंतर गुडघ्यावर बसून इश्वराचे आभार मानले. या आजींचे नाव आहे कॉर्नेलिया रास.
कॉर्नेलिया यांना कोरोनाची लागण नेदरलँडमध्येच एका बेटावर पर्यटनासाठी गेल्या असता झाली होती. पर्यंटकांच्या या गटात एकूण 40 जण होते. यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कॉर्नेलिया यांनी न थकता आणि न डगमगता कोरोनावर मात केली आहे.
आता कुठल्याही गोळ्या सुरू नाही -
कॉर्नेलिया यांना कोरोना संसर्गाची लक्षणे जाणवू लागताच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावरील उपचार यशस्वी ठरले. त्यांची पुतणी मायके डे ग्रूट सांगतात, की त्या यातून बाहेर येतील याचा आम्हाला विश्वास नव्हता. त्यांच्यत ताप आणि श्वासोश्वासाची लक्षणे दिसायला सुरुवात झाली होती. उपचारावेळी त्या अत्यंत शांत होत्या. त्यांनी स्वतःला पूर्णपणे डॉक्टरांच्या स्वाधिन केले होते. मात्र, आता त्या अगदी ठणठणीत आहेत. त्यांना कुठलेही औषध आता सुरू नाही. त्या आता उन्हात बसत आहेत. कारण त्यांना बालकणीत बसायला आवडते.
कॉर्नेलिया यांना वाढदिवसाच्या दिवशी कुणीही भेटू शकले नाही -
न्यूझीलंडमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आजारी पडण्याच्या काही दिवसपूर्वीच कॉर्नेलिया यांचा 107वा वाढदिवस होता. मात्र, त्यांचा हा वाढदिवस सोशल डिस्टेंसिंगमुळे त्यांना एकट्यालाच साजरा करावा लागला. ग्रूट सांगतात, की लॉकडाऊनमुळे त्यांच्या वाढदिवसाला कुटुंबीयांना जाता आले नाही. मी दर आठवड्याला त्यांच्याकडे जाते आणि तेथे बराच वेळ घालवते. सर्वकाही व्यवस्थित झाल्यानंतर त्यांचा वाढदिवस साजरा करू.
यापूर्वी 104 वर्षांच्या आजींनी दिली होती कोरोनाला मात -
कॉर्नेलिया यांच्यापूर्वी 104 वर्षीय अमेरिकेतील लॅपसीज हे कोरोनावर मात करणारे सर्वात वयस्क ठरले होते. त्यांनी दुसरे महायुद्ध आणि 1918 मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूचाही सामना केला आहे. स्पेनिश फ्लूमुळे जवळपास 50 मिलियन लोकांचा मृत्यू झाला होता.