चीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 02:37 AM2021-01-18T02:37:37+5:302021-01-18T02:38:53+5:30
चीनने हेबेई प्रांतातील नॅनगोंग शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे रुग्णांसाठी १५०० खोल्यांचे रुग्णालय पाच दिवसात शनिवारी बांधून पूर्ण केले. नॅनगोंग शहरातील सहा रुग्णालयांपैकी हे एक रुग्णालय आहे.
बीजिंग : चीनमधील हेबेई प्रांतात रविवारी कोरोनाचे १०९ रुग्ण आढळून आल्याने त्या देशात पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. चीनमध्ये आठ महिन्यांनंतर जानेवारीत कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. चीनमध्ये गेल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत.
कोरोनाच्या उगमस्थानाचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे एक पथक चीनमध्ये पाठविले आहे. नेमके त्याचवेळी या साऱ्या घटना घडत आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, हेबेई प्रांतातील १०९ नव्या कोरोना रुग्णांपैकी ९६ जणांना स्थानिक स्तरावर संसर्ग झाला.
आईस्क्रीममध्ये आढळला कोरोना विषाणू -
चीनच्या आईस्क्रीममध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या आईस्क्रीमच्या उत्पादक कंपनीला आता सील ठोकण्यात आले आहे. कोरोना साथीचे उगमस्थान शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक चीनमध्ये दाखल झालेले आहे. नेमके त्याचवेळेला चीनमध्ये ही घटना घडली. बीजिंगजवळ असलेल्या तिआनजिन या भागामध्ये दाक्विआओदाओ फूड कंपनी असून तिने बनविलेल्या आईस्क्रीममध्ये कोरोनाचा विषाणू आढळला. या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या आईस्क्रीममुळे कोणाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे अजून तरी समोर आलेले नाही. आईस्क्रीम गेल्या काही दिवसांत कोणाला विकले गेले, याची माहिती घेतली जात आहे.
दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत -
चीनने हेबेई प्रांतातील नॅनगोंग शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे रुग्णांसाठी १५०० खोल्यांचे रुग्णालय पाच दिवसात शनिवारी बांधून पूर्ण केले. नॅनगोंग शहरातील सहा रुग्णालयांपैकी हे एक रुग्णालय आहे.