अमेरिकेत जाण्याचं स्वप्न ठरलं जीवघेणं! -३५ डीग्री तापमानात पती-पत्नी आणि मुलांचा मृत्यू; समोर आली हादरवणारी कहाणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 07:57 PM2023-01-16T19:57:45+5:302023-01-16T19:59:09+5:30
११ गुजराती लोकांना बेकायदेशीरपणे कॅनडातून अमेरिकेत जाण्यासाठी पाठवणाऱ्या दोन आरोपींना गुजरातमधील गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली.
११ गुजराती लोकांना बेकायदेशीरपणे कॅनडातून अमेरिकेत जाण्यासाठी पाठवणाऱ्या दोन आरोपींना गुजरातमधील गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. या ११ जणांपैकी चार लोक गांधीनगरच्या पटेल कुटुंबातील होते. ज्यांना या दोन्ही आरोपींनी उणे ३५ अंश तापमानात चालण्यास सांगितलं होतं आणि बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून अमेरिकेत कसा प्रवेश करायचा ते सांगितलं गेलं होतं. सुमारे वर्षभरापूर्वी कॅनडाच्या पोलिसांना अमेरिकेच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर ४ जणांचे मृतदेह सापडले होते. या चौघांमध्ये पती पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भावेश पटेल आणि योगेश पाटे या दोघांनाही बेकायदेशीर इमिग्रेशन (मानवी तस्करी) आणि हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या दोघांचे त्या ११ गुजरातींसोबत शेवटचं काय बोलणं झालं होतं हे पोलिसांनी सांगितलं. "तुम्हाला उणे ३५ अंश तापमानात चालावे लागेल जेणेकरून कॅनडाचे आणि यूएस पोलिस दल तुम्हाला अटक करू शकत नाहीत. तुम्हाला रात्रीच्या अंधारात अमेरिकन गॅस स्टेशनच्या लाइटला फॉलो करावे लागेल, तुम्हाला या भागात नेव्हिगेशन मिळणार नाही", असं आरोपींचं अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसू पाहणाऱ्यांसोबत शेवटचं बोलणं झालं होतं.
सीमेपासून १२ मीटर अंतरावर सापडले मृतदेह
मानवी तस्करांनी गुजराती कुटुंबाला दिलेल्या या शेवटच्या सूचना होत्या, असे पोलिसांनी सांगितले. जगदीश पटेल (३९), वैशाली पटेल (३७) आणि त्यांची दोन मुले विहांगी पटेल (११) आणि धार्मिक पटेल (३) यांचे मृतदेह अमेरिकेच्या सीमेपासून अवघ्या १२ मीटर अंतरावर कॅनडाच्या पोलिसांना सापडले. त्यांच्या दुःखद मृत्यूनंतर ही बाब स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चव्हाट्यावर आली. लोक हताश होऊन मोठी रक्कम देऊन बेकायदेशीरपणे सीमा ओलांडतात, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
कॅनडामधील फेनिल पटेल आणि बिट्टू पाजी नावाचे आणखी दोन आरोपी कॅनडामधून अवैध स्थलांतरित होण्यासाठी लोकांना मदत करत होते. फेनिल आणि बिट्टूची खरी नावे समोर आलेली नाहीत, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.