शेख हसिना यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या 11 जणांना कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 12:55 PM2017-10-30T12:55:43+5:302017-10-30T13:11:17+5:30
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांची 28 वर्षांपुर्वी त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 11 दोषींना 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 1989 साली शेख हसिना यांच्या घरात बॉम्बस्फोट करणाऱ्या दोषींनाही जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे.
ढाका- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांची 28 वर्षांपुर्वी त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 11 दोषींना 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 1989 साली शेख हसिना यांच्या घरात बॉम्बस्फोट करणाऱ्या दोषींनाही जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे.
या दोषींना कोर्टाने 20 हजार टका (240 डॉलर्स) चा दंडही सुनावला आहे. हे लोक बांगलादेश फ्रीडम पार्टीचे सदस्य आहेत. याच पक्षाचा बांगलादेशचे राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांच्या हत्येमध्ये सहभाग होता. ढाकाच्या अतिरिक्त महानगरी फौजदारी न्यायालयातील वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार 8 लोकांवर खटला चालवण्यात आला मात्र फ्रीडम पार्टीच्या कर्नल अब्दुल राशिद या अध्यक्षासह इतर दोषी अजूनही परागंदा आहेत. वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांची हत्या करणाऱ्या राशिदला यापुर्वीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला
रोहिंग्यांची नायिका, वंगबंधूकन्येला शांततेचे नोबेल ?
बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या मुजिबूर रेहमान यांची 1975 साली हत्या करण्यात आली होती.
11 ऑगस्ट 1989 रोजी फ्रीडम पार्टीचे लोक त्यावेळेस विरोधी पक्षनेत्या असणाऱ्या शेख हसिना वाजेद यांच्या धनमोंडी येथील निवासस्थानी आले आणि अंदाधुंद गोळीबार व बॉम्बस्फोटही केला. मात्र सुदैवाने शेख हसिना या हल्ल्यातून बचावल्या. पोलिसांनी त्यांच्यावर उलट गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या नेत्यांचा जयजयकार करत मारेकरी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. 1997 आणि 2009 साली या गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. 21 वर्षांच्या राजकीय विजनवासानंतर पुन्हा सत्तेत आलेल्या अवामी लीगने 1996 साली या हत्य़ेचा तपास सुरु करुन खटल्याच्या कामकाजास प्रारंभ केला होता.
वंगबंधूंच्या हत्येनंतर शेख हसिना यांना मारण्यासाठी किमान 19 वेळा प्रय्तन केला गेल्या अवामी लीगच्या नेत्यांनी सांगितले आहे. 1975 साली उठाव करणाऱ्या 5 नेत्यांना 8 वर्षांपुर्वी फाशी देण्यात आली.